Insurance : जेवढी पळवाल चारचाकी, तेवढाच मिळवा इन्शुरन्स, विम्यासाठी धोरणात बदल..अशी करा विम्यात बचत
Insurance : जेवढी कार पळवाल, आता तेवढाच इन्शुरन्स घेता येईल..काय आहे ही योजना..
नवी दिल्ली : महागाई (Inflation) असतानाही यंदाच्या दिवाळीच्या मुहुर्तावर अनेकांनी चारचाकीचे स्वप्न साकारले. त्यांच्या घरासमोर चमचमती नवी कोरी कार (Car) उभी आहे. सप्टेंबर महिन्यात देशात साडे तीन लाखांहून अधिकच्या प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. सवलतीचा पाऊस आणि ऑफर्समुळे ग्राहकांनी कार आणि इतर वाहनांची खरेदी केली. आता वाहन खरेदी केले म्हणजे विमा खरेदी करणे आलेच..तर विमा खरेदी (Insurance) करताना आता अनेक बदल झाले आहेत.त्याची माहिती घेतल्यास तुमचा मोठा फायदा होऊ शकतो.
देशात मोटार व्हेईकल अॅक्ट अंतर्गत विमा खरेदी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही या सणासुदीत कार खरेदी केली असेल अथवा खरेदीची तयारी झाली असेल तर तुम्ही आता बदललेल्या नियमानुसार विमा स्वस्तात मिळवू शकता..
Pay as you drive या धोरणानुसार, तुम्हाला जेवढी कार पळवायची आहे, तेवढाच विमा खरेदी करता येऊ शकतो. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) Pay as you drive या धोरणाचा अंगिकार केला आहे. या मॉडेलनुसार वाहन जितक्या किलोमीटरचा प्रवास करेल, त्या हिशोबाने त्याला विम्याची रक्कम द्यावी लागेल.
मोटर इन्शुरन्स अधिक स्वस्त करण्यासाठी आणि वाहनधारकांना विमा खरेदीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही अभिनव योजना सुरु करण्यात आली आहे. जे वाहनधारक कमी कार चालवितात, त्यांच्यासाठी हा विमा फायदेशीर आहे. कारण यामध्ये कमी हप्ता द्यावा लागतो.
Pay how you drive हे आणखी एक मॉडेल आहे. याअतंर्गत वाहनधारक कशी कार चालवितो. त्याची सवय आणि प्रोफाईल ट्रॅक करण्यात येतो. जर त्याची ड्राईव्हिंग चांगली असेल तर त्याला प्रिमिअम भरताना सवलत, सूट देण्यात येते.
Pay how you drive यासाठी ग्राहकांना नियमांचे पालन करावे लागते. तसेच कार चालविताना सावधानता बाळगावी लागते. पण तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला सवलत मिळत नाही.
दारात एकापेक्षा अधिक कार असतील तर तुम्ही फ्लोटर पॉलिसी निवडणे अत्यावश्यक ठरते. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र पॉलिसी घेण्याची गरज पडत नाही. एका विमा पॉलिसीतच तुमच्या सर्व वाहनांना विम्याचे संरक्षण मिळते.