बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजाराची अपडेट काय? सेन्सेक्स, निफ्टीचा कल काय?
Budget 2025 Stock Market : बजेटपूर्वी सेन्सेक्स आणि निफ्टीची घोडदौड सुरू आहे. काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. तर काही शेअर्सची मरगळ अजून झटकलेली नाही. बाजाराचे अर्थसंकल्पाकडे डोळे लागले आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजाराने बजेट डेला चांगला प्रतिसाद दिला आहे. आजच्या अर्थसंकल्पापूर्वी सेन्सेक्स आणि निफ्टीची घोडदौड सुरू आहे. काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. तर काही शेअर्सची मरगळ अजून झटकलेली नाही. बाजाराचे अर्थसंकल्पाकडे डोळे लागले आहेत. काल Nifty 50, 23,508.40 अंकावर बंद झाला होता. तर Sensex काल 77,500.57 अंकावर बंद झाला होता. तर आज सकाळच्या सत्रात थोडी सरस कामगिरी दिसत आहे.
सध्या बाजाराची स्थिती काय?
सध्या बीएसई सेन्सेक्स 77,665.82 अंकावर आहे. त्यात 1.14 टक्क्यांची वाढ सकाळी 9:56 मिनिटांनी दिसत आहे. सेन्सेक्स सकाळच्या सत्रात अजून मोठी प्रतिक्रिया देण्यास घाबरत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे निफ्टी 50 हा यावेळी 23,563.15 अंकावर व्यापार करत आहे. त्यातही 1.31 टक्क्यांची वाढ दिसत आहे. तरीही दोन्ही निर्देशांक खुल्या मनाने मैदानात उतरलेले दिसत नाही. बाजारासह गुंतवणूकदारांचे बजेटकडे लक्ष लागले आहे. महागाई, अमेरिकन धोरणं यांचा थेट परिणाम होत असतानाच आता बजेट आर्थिक शिस्त लावणारे असेल की मध्यमवर्गांना दिलासा देणारे, यावर बाजाराचा रोख दिसू शकतो.




काल वॉल स्ट्रीटवर गोंधळ
नवीन डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या धोरणांमुळे अमेरिकनच नाही तर जगभरातील व्यापार आणि व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आलेल्या नवीन करामुळे काल वॉल स्ट्रीटवर मोठा गोंधळ उडाला आहे. कॉल स्ट्रीटवर शेअर बाजारात घसरण दिसून आली. तर इतर बाजारावर सुद्धा या घडामोडीचा परिणाम दिसून आला.
या क्षेत्रावर गुंतवणूकदारांचे लक्ष
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण थोड्याच वेळात बजेट सादर करतील. त्या यावेळी 8 व्यांदा बजेट सादर करतील. संरक्षण, रेल्वे, बांधकाम, एफएमसीजी, फार्मा, हॉस्पिटल, विमा, बँक या क्षेत्रातील स्टॉकवर आजच्या बजेटचा परिणाम दिसेल. तर आयटीसी लिमिटेड या महत्त्वपूर्ण स्टॉकवर सुद्धा गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष असेल. एकदंरतीच बाजार थोड्यावेळाने हिरवाईत न्हाहतो की रक्तबंबाळ होऊन लालरंगाची रेषा ओढतो हे लवकरच समोर येईल.