Anil Ambani : दैवानं दिलं, कर्माने नेलं, अनिल अंबानी यांना अपयशानं असं घेरलं
Anil Ambani : एकदा अपयश हात धुऊन मागं लागलं की लवकर पिच्छा सोडत नाही म्हणतात. अर्थात त्यासाठी तुमच्या चुका पण कारणीभूत असतात. सल्ले आणि सल्लागार तुम्हाला गप्पगार करत असतील तर वेळीच सावध होणे महत्वाचे आहे. नाहीतर अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत.
नवी दिल्ली : रिलायन्सचं (Reliance Group) साम्राज्य भारतातच नाहीतर जगभर पसरलं आहे. 1958 मध्ये धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांनी या समूहाची पायाभरणी केली. रिलायन्स आज हा भारताचा मोठ्या उद्योग समूह आहे. मुकेश अंबानी यांनी धीरुभाईंचा वारसा समर्थपणे पेलला आणि वाढवला. अनिल अंबानी यांना मोठी गती मिळाली नाही. त्यांनी झेप घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयशाने घेरले. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आज भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील टॉप-10 श्रीमंतात पुन्हा कमबॅक करण्याची तयारी करत आहेत. तर अनिल अंबानी (Anil Ambani) धराशायी झाले आहेत. व्यवसाय चौपट झाला तर एक एक कंपन्या त्यांच्या हातातून निसटत आहेत. अनिल अंबानींना स्वतःला दिवाळखोर जाहीर करण्याची वेळ आली आहे. काय आहेत त्यांच्या अपयशाची कारणे..
दैवानं दिलं कर्माने नेलं रिलायन्स समूहात वाटेहिस्से झाले. त्यावेळी हा अनेक गुंतवणूकदारांना, मोठंमोठ्या उद्योग समूहाने धक्का होता. अंबानी यांच्या घरात फूट पडणार नाही, असे अनेकांना वाटत होते. मुकेश अंबानी यांच्या हिश्यात पेट्रोलकेमिकल, टेक्साटाईल, रिफायनरी, तेल-गॅस असे उद्योग आले. तर अनिल अंबानी यांच्याकडे त्यावेळेस उद्योगात उभारी घेणारे उद्योग अलगद येऊन पडले. टेलिकॉम, फायनान्स आणि ऊर्जा क्षेत्रातील उद्योग त्यांच्या वाट्यात आले. पण दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं, अशी त्यांची गत झाली. आधुनिक युगातील उद्योग हाती येऊन सुद्धा त्यांन कमाल दाखविता आली नाही. त्यांना अतिआत्मविश्वास नडला आणि वाताहत झाली.
धनाची पेटी हाती, उपयोग काहीच नाही अनिल अंबानी यांच्या हाती बदलत्या जगाचा पासवर्ड होता. त्यावेळी टेलिकॉम, पॉवर आणि एनर्जी क्षेत्र विकसीत होत होते. हे उद्योग म्हणजे यशाची गुरुकिल्ली हाती लागल्या सारखं होते. 2008 मध्ये जगातील टॉप-10 श्रीमंतात अनिल अंबानी सहाव्या क्रमांकावर होते. पण त्यांना यशात सातत्य ठेवता आले नाही. या सेक्टरमध्ये त्यांना भारतातील यशस्वी खेळाडू होता आले असते. पण नियोजन, आरखडा, दुरदृष्टीचा अभाव, अंगभूत कौशल्य, माणसांची निवड, गुंतवणुकीचा अभाव, वेळेचे व्यवस्थापन आणि अनेक उणीवांनी त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावला.
अपयशाची ही महत्वाची कारणे
- प्लॅनिंगचा अभाव अनिल अंबानी यांना चांगल्या कंपन्या हाती येऊन अपयश आले. नियोजनाचा अभाव, योग्य निर्णय आणि वेळेच्या व्यवस्थापनातील गडबड त्यांना भोवली. तसेच एकामागून एक उत्पादनं बाजारात आणण्याची घाई अपयशाचं कारण ठरली.
- अति घाई, संकटात नेई घाईगडबडीत घेतलेले निर्णय त्यांच्या अंगलट आले. झटपट श्रीमंत होण्याचे, कंपन्यांचा वारु चौफेर उधळण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांना एनर्जी आणि टेलिकॉम सेक्टरचे किंग व्हायचे होते. पण त्यासाठीचा आराखडा चुकला.
- एका ना धड भाराभर चिंध्या एका मागून एक व्यवसाय उघडताना, त्यांची तारांबळ उडाली. एकाही व्यवसायावर, त्यांना फोकस करता आला नाही. एकामागून एक अनेक सेक्टरमध्ये एकाचवेळी अचाट, अफाट प्रयोग करण्याची घाई त्यांना नडली. अनेक उत्पादनं बाजारात उतरवल्या गेली. त्यातून अपेक्षित परतावा मिळाला नाही.
- कर्जाने बुडवले कर्ज काढून स्वप्न साकरण्याची घाईने त्यांना बुडवले. व्यवसायाचा विस्तार, नवीन व्यवसायाची घौडदौड यासाठी पैसा लागणार होता. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढले. कर्जाचा डोलारा वाढत गेला. कर्जाची परतफेड करता आली नाही. कर्जाचे दुषचक्र थांबता थांबे ना. कंपन्या विक्री करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
- मंदीचा फटका अनिल अंबानी यांना 2008 साली आलेल्या मंदीचा मोठा फटका बसला. त्यासाठी त्यांच्याकडे कोणतेच प्लॅनिंग नव्हते. तिथून त्यांच्या ओहोटीला सुरुवात झाली. त्यांना सावरता आले नाही. त्यानंतर त्यांनी काही ऑफर्सच्या माध्यमातून व्यवसायाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता.