नवी दिल्ली : भारतातील सर्वात जास्त वैल्यूएशन असलेली स्टार्टअप कंपनी बायजूस संकटात सापडली आहे. कोरोना महामारी दरम्यान बायजूस घरा घरात पोहचली होती. त्यावेळी शाळा कॉलेज बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी बायजूसची वाट धरली होती. मात्र, शाळा – कॉलेज सुरु झाल्याने अचानक बायजूस कंपनीच्या वाढीत घट झाल्याचे दिसून आले. यामुळे बायजूसवर कर्ज वाढत गेले. बायजूसचे को-फाउंडर बायजू रवींद्रन यांचे सहयोगीही त्यांची साथ सोडून जात आहे, यामुळे कंपनीवर अधीकच संकट येणार असल्याचे म्हटले जात आहे.
गुरुवारी 29 तारखेला कंपनीचे को-फाउंडर बायजू रवींद्रन यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. यात त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. कंपनी सध्या संकटात असली तरी, लवकरच या संकटावर आपण मात करु असा विश्वास यावेळी बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना दिला.
बायजूस कंपनीच्या बोर्डमध्ये असलेल्या 3 सदस्यांनी राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. कंपनीच्या ‘ऑडिटर डेलॉयटने’ ही कंपनीतून राजीनामा दिला आहे. कंपनीतून राजीनामा दिलेले सदस्य सिकोइया कॅपीटल इंडियाचे जीवी रविशंकर, चैन जुकरबर्ग इनिशिएटिवचे विवियन वू आणि प्रोससचे रसेल स्टॉक हे आहेत. या सर्वांचे रवींद्रन यांच्या सोबत वाद झाल्याचे समजते.
बायजूस कंपनीवर1.2 बिलियन डॉलरच्या कर्जाचे एक प्रकरण अमेरिकेच्या कोर्टात सुरु आहे. कंपनीला कर्जाची परतफेड करायची असून, सध्या कंपनीकडे कर्ज फेडण्याचे पैसे नाहीत. या कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनीने 1 बिलियन डॉलरचे फंड गोळा करणार आहे. यासाठी शेयर होल्डर्ससोबत चर्चा सुरु आहे. या कर्जामुळे अनेक रिपोर्टमध्ये बायजूस कंपनीच्या आर्थिक स्थितीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यातच कंपनीने आपल्या 1000 कर्मचाऱ्यांना नौकरीवरुन काढून टाकले आहे.
बायजूस ही एक बहुराष्ट्रीय शैक्षणिक कंपनी आहे. याचे मुख्यालय बेंगलुरु येथे आहे. कंपनीची स्थापना 2011 साली बायजू रवींद्रन आणि त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ यांनी केली. काही वर्षातच कंपनी प्रसिध्द झाली. बायजू रवींद्रन यांनी इंजीनियरिंग केली आहे. ते 2006 सालापासून विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवत आहे.