भारतीय व्यापाऱ्यांचा चीनला 40 हजार कोटींचा झटका, दिवाळीला ‘मेड इन चायना’वर बंदी
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (CAIT - कॅट) आवाहनानुसार 7 कोटी व्यापाऱ्यांनी यावर्षीच्या दिवाळीत चिनी वस्तूंची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (CAIT – कॅट) आवाहनानुसार यावर्षीच्या दिवाळीत देशातील कोणत्याही बाजारात चीनमध्ये तयार झालेला माल विकला जाणार नाही. कॅटने चीनच्या वस्तूंवर बहिष्कारासाठी मोहिमच हाती घेतली आहे. या अंतर्गत भारतयी बाजारांमध्ये भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य दिलं जाणार आहे. जागतिक बाजारपेठ असलेल्या भारताच्या बाजारपेठेतील या निर्णयाने चीनला मोठा झटका बसणार आहे. यामुळे चीनला जवळपास 40 हजार कोटींचा आर्थिक फटका बसणार आहे (CAIT boycott Made in China product during Diwali festival).
यंदा भारतीय बाजार स्वदेशी वस्तूंनी प्रकाशित करण्याची तयारी सुरु झाली आहे. चीनसोबत सुरु असलेल्या तणावपूर्ण स्थितीत भारताने व्यापाराच्या माध्यमातून चीनला सडेतोड उत्तर देण्याचा निश्चय केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ अशा अनेक अभियानांची घोषणा केली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्यापाऱ्यांची स्थिती लक्षात घेता कॅटने या सणांच्या काळात चिनी वस्तूंवर बहिष्काराचा निर्णय घेतलाय. तसेच देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत भारतात बनवलेल्या वस्तू पोहचवण्याचा निर्धार केला आहे.
कॅटने यावर्षी 10 जूनला “भारतीय सामान, हमारा अभिमान” नावाची मोहिम सुरु केली होती. याचाच भाग म्हणून आता घराघरात भारतीय वस्तू पोहचवण्याची तयारी सुरु आहे. या मोहिमेत देशभरातील जवळपास 7 कोटी व्यापारी सोबत असल्याचा दावा कॅटने केला आहे. तसेच या सर्वांनी चिनी वस्तूंना विरोध केल्याचंही सांगण्यात आलं आहे.
40 हजार कोटींच्या व्यापारावर परिणाम
दरवर्षी राखी पोर्णिमा ते दिवाळी या काळात चीनमधून भारतात जवळपास 40 हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात होते. हीच आर्थिक उलाढाल लक्षात घेऊन कॅटने नेहमीच भारतीय बाजारावरील चीनच्या वर्चस्वाला विरोध केलाय. यावेळी मात्र चीनविरोधात ठोस कृती कार्यक्रम तयार करुन त्याची अंमलबजावणी होत आहे. याचाच भाग म्हणून कॅटने 2 महिन्यांपूर्वीच देशातील 4 राज्यांमध्ये सणांमध्ये लागणाऱ्या वस्तूंचं उत्पादन सुरु केलं आहे. त्यामुळे भारतीय बाजारात या वस्तूंची सहज उपलब्धतता होणार आहे. याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुनही या वस्तूंची विक्री करण्यावर भर दिला जाणार आहे.
भारतीय वस्तूंच्या मागणीत वाढ
कॅटने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी देशातच नाही तर परदेशातूनही भारतीय वस्तूंना मागणी वाढली आहे. देशातील नागरिकही जागरुक झाले आहेत आणि स्वदेशी सामान खरेदी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे यावेळी भारतीय व्यापार वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी दिवाळीसाठीच्या वस्तू दिवे, वीजमाळा, रंगबिरंगी वीजेचे बल्ब, सजावटीच्या मेणबत्ती, सजावटीचं सामान, रांगोळी, पूजा साहित्य, मातीच्या मूर्ती आणि अशा अनेक वस्तूंचं उत्पन्न भारतीय कामगारांकडून होत आहे. या सर्व वस्तू लवकरच बाजारापर्यंत पोहचवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना या वस्तू सहज मिळतील. सोबतच ऑनलाईन विक्रीवरही भर दिला जात आहे.
संबंधित बातम्या :
सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवार
बॉयकॉट चायनीजचा नुसताच दिखावा, भारतात चिनी मोबाईल्सची तुफान विक्री
भारतीय उद्योगपतीचा झटका, चीनला तब्बल 3000 कोटी रुपयांचा फटका
CAIT boycott Made in China product during Diwali festival