Economic Recession | चीनही मंदीच्या फेऱ्यात? या मोठ्या कंपनीने तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ
Economic Recession | चीनही मंदीच्या फेऱ्यात अडकल्याचे संकेत मिळत आहेत. चीनची या सर्वात मोठ्या कंपनीची कमाई घटली आहे. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.
Economic Recession | आतापर्यंत जगातिक मंदीची (Global Recession) चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होती. पण त्याचे परिणाम ही दिसून येत आहे. अमेरिकेत (America) काही तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी कमी-अधिक प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली. भारतातही काही स्टार्टअप्सने (Start up) कपाताची निर्णय घेतला. पण नवीन भरती ही केली आहे. पण चीन मध्ये मात्र मंदीचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. चीनची सर्वात मोठी कंपनी अलीबाबाने (Alibaba) कमाई अर्ध्यावर आल्याने कर्मचारी कपातीचे धोरण राबविले आहे. कंपनीने 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले (Sack Employees) आहे.यावरुन चीनच्या अर्थव्यवस्थेवर किती दबाव आहे हे दिसून येते.चीनच्या सरकारी बँकांचे कर्ज बुडत असून अनेकांची स्थिती बिकट होत असल्याच्या बातम्याही अलीकडे आल्या होत्या. आता अलीबाबाकडून टाळेबंदीची ही मोठी बातमी आली आहे. अलिबाबाच्या कमाईत (Earnings) जवळपास 50 टक्क्यांनी घट झाल्यामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. जून तिमाहीत अलीबाबाची एकूण कमाई 22.74 अब्ज युआन नोंदवली गेली आहे, तर 2021 मध्ये याच तिमाहीत निव्वळ उत्पन्न 45.14 अब्ज युआन होते. यामुळे चीनची अर्थव्यवस्था (China Economy) मंदीच्या दिशेने जात असल्याची चर्चा सुरु आहे.
एकूण 2,45 लाख कर्मचारी घरी
अलीबाबाने जून तिमाहीतच 9,241 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचे अहवालात म्हटले आहे. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ मधून हा अहवाल समोर आला आहे. अलीकडील कपातीनंतर अलीबाबामध्ये एकूण 2,45,700 कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीबाबावर नियामक दबाव, मागणीत मोठी घट आणि अर्थव्यवस्थेत मंदी दिसून येत आहे. अलिबाबाने जूनपर्यंतच्या सहा महिन्यांत 13,616 कर्मचारी कमी केले आहेत. मार्च 2016 पासून आतापर्यंतची ही सर्वात मोठी कपात मानण्यात येत आहे.
काय म्हणाले अलिबाबाचे अध्यक्ष?
दुसरीकडे, अलीबाबाचे अध्यक्ष आणि सीईओ डॅनियल झांग योंग यांनी सांगितले आहे की, या वर्षाच्या अखेरीस ते त्यांच्या कंपनीमध्ये 6000 नवीन पदवीधरांना सहभागी करुन घेणार आहेत. Crunchbase मध्ये प्रकाशित झालेल्या तपशीलवार अहवालात असे म्हटले आहे की, सिलिकॉन व्हॅलीमधील इतर अनेक टेक कंपन्यांनी गेल्या महिन्यात 32,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. यापैकी काही कंपन्यांमध्ये ट्विटर आणि टिकटॉकचाही समावेश आहे. याशिवाय Shopify, Netflix आणि Coinbase सारख्या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचे धोरण राबविले आहे. अनेक आशियाई देश मंदीच्या गर्तेत जाऊ शकतात असे सतत संकेत मिळत आहेत. बहुधा श्रीलंका आहे जिथे गृहयुद्धाची परिस्थिती आहे आणि राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही राजीनामा द्यावा लागला आहे. चीनमध्ये मंदीची लाट 20% पर्यंत असेल असा अंदाज आहे.