पुणे : एकीकडे राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर गेल्या 24 दिवसांपासून स्थिर असल्याने सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे पुणेकरांना (pune) सीएनजी (CNG) दरवाढीचे धक्क्यावर धक्के बसत आहेत. आज पुन्हा एकदा सीएनजीचे दर वाढवण्यात आले (CNG rates hike) आहेत. गेल्या दीड महिन्यात तिसऱ्यांदाच सीएनजीच्या दारत वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात दोन रुपये वीस पैशांची वाढ करण्यात आल्याने आता सीएनजीचे दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलोवर पोहोचले आहेत. नवी दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वी देखील सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. तेव्हा सीएनजीचे दर 73 रुपयांवरून 75 रुपयांवर पोहोचले होते. तर त्यापूर्वी सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने सीएनजीचे दर 68 रुपयांवरून थेट 73 रुपयांवर पोहोचले होते. आज पुन्हा एकदा दरात दोन रुपये वीस पैशांची वाढ करण्यात आल्याने सीएनजीचे दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलोवर पोहोचले आहेत.
सीएनजीच्या वापराला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सीएनजीच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. तशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये केली होती. त्यानुसार एक एप्रिलपासून सीएनजीच्या व्हॅटमध्ये साडेतेरा टक्क्यांची कपात करण्यात आल्याने सीएनजी गॅस प्रति किलोमागे सहा रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही, त्यानंतर दोनच दिवसांमध्ये कंपन्यांकडून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली. सीएनजीचे दर पाच रुपयांनी वाढवण्यात आले. त्यानंतर दोन रुपयांनी व आता पुन्हा एकदा दोन रुपये वीस पैशांची वाढ करण्यात आली आहे. याचा मोठा आर्थिक फटका ग्राहकांना बसताना दिसत आहे.
एकीकडे आज पुण्यात पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे, मात्र दुसरीकडे राज्यात गेल्या 24 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणारा कर कमी करावा असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने राज्यांना करण्यात आले आहे.