INFLATION RATE: ….महंगाई डायन! 8 वर्षातील सर्वाधिक महागाई, रेकॉर्डब्रेक भाववाढ
नियमित आहारातील खाद्यपदार्थांपासून इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गेल्या 8 वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे. आज (गुरुवारी) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित रिटेल महागाईचा दर एप्रिल मध्ये 7.79 टक्क्यांवर पोहोचला आहे.
नवी दिल्लीः सर्वसामान्य जनतेला महागाईच्या (Inflation Rate) तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. नियमित आहारातील खाद्यपदार्थांपासून इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गेल्या 8 वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे. आज (गुरुवारी) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित रिटेल महागाईचा दर एप्रिल मध्ये 7.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वीच मे 2014 मध्ये महागाईचा दर 8.32% वर पोहोचला होता. रिझर्व्ह बँकेने (Reserve bank of India) निर्धारित केलेली 6% मर्यादा गाठणारा सलग चौथा महिना ठरला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रिटेल महागाई दर 6.07%, जानेवारी मध्ये 6.01% आणि मार्च मध्ये 6.95% नोंदविला गेला होता. एक वर्षापूर्वी एप्रिल 2021 मध्ये रिटेल महागाईचा दर 4.23% वर पोहोचला होता.
आरबीआयचं गणित:
रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षातील पहिल्या आर्थिक धोरण विषयक बैठकीत पहिल्या तिमाहित 6.3%, दुसऱ्या 5%, तिसऱ्या 5.4% आणि चौथ्या तिमाहित 5.1% स्वरुपात वाढत्या महागाईचा अंदाज वर्तविला होता. वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आपत्कालीन बैठकीत रेपो दरात 0.40% वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.
महागाई कशी मोजतात?
सीपीआय (कंझ्युमर्स प्राइस इंडेक्स) किंवा किरकोळ किंमत निर्देशांक निश्चित करताना विविध घटकांचा आढावा घेतला जातो. यामध्ये दैनंदिन वापरातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वस्तू विचारात घेतल्या जातात.केंद्रीय सांख्यिकी संस्था (सीएसओ) विशिष्ट सूत्रांच्या आधारावर किंमत निर्देशांक निश्चित करते. सीपीआय किरकोळ किंमत निर्देशांक ग्रामीण, शहरी आणि सर्वसाधारण अशा तीन प्रकारांत वर्गवारी केली जाते. रिझर्व्ह बँकेला धोरण निश्चिती करताना महागाई दराची आकडेवारी विचारात घ्यावी लागते.
इंधन वधारण, महागाईला कारण:
पेट्रोल-डिझेलसोबत घरगुती इंधनाचे दरात दिवसागणिक वाढ होत आहे. त्यासोबतच सीएनजी आणि पीएनजीचे दर देखील महागाई यादीत जोडले गेले आहेत. गेल्या दोन महिन्यात सीएनजी भावात पाच वेळा वाढ नोंदविली गेली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला गॅस कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीच्या फेररचनेबाबत निर्णय घेणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चालू वर्षी मार्च महिन्यात गॅस कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढविले होते. त्यासोबतच राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवरुन 950 रुपयांवर पोहोचली होती.