नवी दिल्ली : झिरो कोविड धोरण मागे घेताच चीनमध्ये कोरोनाने थैमान (Corona Virus in China) सुरु केले आहे. चीनमधील या नवीन लाटेमुळे भारतीय फार्मा इंटस्ट्रीला (Pharma Industry of India) झटका बसला आहे. औषधी निर्मितीसाठी कच्चा माल आणि रसायनांसाठी (API) भारतीय औषध निर्माता कंपन्या मोठ्या प्रमाणात चीनवर अवलंबून आहेत. त्यामुळे या कंपन्यांपुढे संकट उभं ठाकले आहे. त्यामुळे देशातंर्गत औषधांवरील खर्च वाढण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे चीनने कच्चा मालाचा पुरवठा कमी केला आहे. त्याचा थेट परिणाम औषधांच्या किंमतीवर होणार आहे. API च्या किंमती 12 ते 25 टक्के वाढण्याची शक्यता आहे. परिणामी देशातंर्गत अनेक औषधं महागण्याची शक्यता आहे.
भारतीय उद्योग आणि उद्योजकांना पुरवठा साखळी खंडीत होण्याची भीती सतावत आहे. जर कच्चा मालाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. तर देशात त्याचा परिणाम दिसून येईल. देशातंर्गत काही औषधांचा तुटवडा येऊ शकतो. त्यामुळे त्याचा किंमतीवरही परिणाम होईल.
चीनच्या फार्मा इंडस्ट्रीवर लक्ष ठेवत मेहुल शाह यांनी सांगितले की, Azithromycin, Paracetamol, Oral आणि injectable antibiotics च्या API च्या किंमतीत कमाल वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती अवाक्याबाहेर जात आहे. त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होणार आहे.
बाजारातील सूत्रांनुसार, गेल्या दोन आठवड्यात Paracetamol च्या एपीआयची किंमत 450 रुपयांहून 550 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. पंधरवाड्यात Azithromycin च्या किंमती 8,700 रुपयांहून वाढून 10,000 रुपये प्रति किलो झाली. इतर औषधांच्या एपीआय किंमतीतही दरवाढ झाली आहे.
औषध तयार करण्यासाठी कच्चा माल चीनमध्ये आयात करावा लागतो. भारतीय कंपन्या चीनवर अवलंबून असल्याने आता चीनमधील घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येईल. ल्यूपिन, सन फार्मास्युटिकल्स, ग्लेनमार्क, मॅनकाइंड, डॉ. रेड्डीज, टोरेंट यासारख्या औषधी कंपन्या चीनवर अवलंबून आहेत.