Mangalsutra : सौभाग्याच्या लेण्यासाठी खर्च झाला कमी, मंगळसूत्र खरेदीत आली स्वस्ताई, पीयूष गोयल यांचा दावा तरी काय?
Piyush Goyal On Mangalsutra : भारतात लग्नकार्यात महिलांसाठी मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं मानण्यात येते. किंमतीपेक्षा मंगळसूत्राशी महिलांची भावनिक सख्य असते. पण तरीही सोन्याच्या वाढत्या किंमती पाहता, मंगळसूत्राची किंमत महाग असते. आता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळसूत्र खरेदी स्वस्त झाल्याचा दावा केला आहे.
भारतात एका विवाहित स्त्रीसाठी मंगळसूत्र हा सर्वात बेशकिंमती ऐवज आहे. यामध्ये भावनिक नातं जोडलं जाते. मुदुराईच्या मिनाक्षी मंदिरात लग्न झालेल्या महिला त्यांच्या मंगळसूत्राचा स्पर्श देवीच्या चरणाला करतात आणि नंतर हे मंगळसूत्र घालतात. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा वाढत्या किंमतींमुळे मंगळसूत्र तयार करणे हे महागडे झाले आहे. त्यासाठी अर्थातच अधिक रक्कम खर्च करावी लागत आहे. पण केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळसूत्र खरेदी स्वस्त झाल्याचा दावा केला आहे. त्याचे कारण तरी काय?
मंगळसूत्र हे काळ्या मन्यांमध्ये ओवून तयार करण्यात येते. पण यामध्ये सोन्याची दोन वाट्या, पेंडेंट असतात. तो या मंगळसूत्राचा मुख्य भाग असतो. काही जणी काळ्या मोत्यांऐवजी सोन्याच्या साखळीचा वापर सुद्धा करतात. भारतात सोने हे आयात करुन आणण्यात येते. बजेटमध्ये मोदी सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात मोठी कपात केली आहे. ते आता 6 टक्क्यांवर आणले आहे. जानेवारीमध्ये आयात शुल्क सर्वाधिक होते.
मंत्री गोयल यांचा दावा तरी काय?
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या मते सोन्यावरील आयात शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता सोन्याच्या महागाईची चिंता करण्याची गरज नाही. एका कार्यक्रमात त्यांनी मंगळसूत्र खरेदी स्वस्त झाल्याचा दावा केला आहे. इंपोर्ट ड्यूटी कमी झाल्याने सोन्याच्या किंमतीत कपात झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आई-बहिणींसाठी आणि देशातील महिलांसाठी सोन्याचे मंगळसूत्र तयार करणे स्वस्त झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,640, 23 कॅरेट 74,337, 22 कॅरेट सोने 69,286 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,730 रुपये, 14 कॅरेट सोने 44,249 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,448 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.