नवी दिल्ली : आयुर्वेदिक औषधं (Ayurveda Medicine) तयार करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी डाबर इंडिया (Dabur India) आता मसाला मार्केटमध्ये डंका वाजविणार आहे. ही कंपनी मसाला विक्री करणार आहे. भारतातील लोकप्रिय मसाला ब्रँड बादशाह मसाल्यात (Badshah Masala Deal) डाबरने मोठा हिस्सा मिळवला आहे. बादशाह मसाला कंपनीत डाबरचा 51 टक्के वाटा आहे. कंपनी आता FMCG सेक्टरमध्ये नशीब आजमावणार आहे. अर्थात कंपनीसाठी मार्केट जरी नवीन असले तरी त्यांच्याकडील ब्रँड मात्र प्रचंड लोकप्रिय आहे.
आयुर्वेदिक औषधी आणि खाद्यान्नाच्या सेक्टरमध्ये डाबरला पतंजलीसोबत सामना करावा लागत आहे. FMCG सेक्टरमध्ये पतंजलीची घौडदौड सर्वांनाच अचंबित करणारी आहे. या क्षेत्रात पतंजलीने सूसाट प्रगती केली आहे. पतंजलीने कोरोना काळातही प्रचंड व्यवसाय केला आहे. आयुर्वेदिक उत्पादनासह डेली नीड्समध्ये पतंजली हातपाय पसरवत आहे.
FMCG सेक्टरमधील डाबरच्या प्रवेशामुळे आता सामना रंगणार आहे. या व्यावसायिक उलाढालीमुळे पतंजलीला या क्षेत्रात आणखी एका तगड्या प्रतिस्पर्ध्यासोबत टक्कर द्यावी लागणार हे निश्चित आहे. पतंजलीही या घौडदौडीत मागे नाही. पतंजलीने रुचि सोया कंपनी ताब्यात घेतली आहे. तसेच सर्व फूड व्यवसाय पतंजली फूड कंपनीच्या नावे एका छताखाली आणला आहे.
दळलेल्या मसाल्यात बादशाह मसाला गृहिणी, हॉटेल, रेस्टॉरंट, धाबा मालकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ब्रँड होता. बादशाह, मसाला उत्पादन, विपणन आणि निर्यात करतो. यामध्ये कंपनी सिंगल टाईप मसाले, मसाला ब्लेंड आणि सीजनिंग इत्यादी कामे करते.
डाबर इंडियानुसार, 2 जानेवारी 2023 पासून बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आती तिची उपकंपनी असेल. बादशाह मसाल्याचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत झावेरी यांच्या मते, डाबरमुळे कंपनीला भविष्यात मोठी झेप घेता येईल. या दोन्ही कंपन्या एकमेकींना पुरक आहेत.
बादशाह मसाला कंपनीच्या संपादनानंतर डाबर इंडिया ब्रँडेड मसाल्यांच्या व्यापारात उतरली आहे. भारतात ब्रँडेड मसाल्याचा व्यापार 25,000 कोटी रुपयांचा आहे. डाबर इंडिया कंपनी त्यांची उर्वरीत 49 हिस्सेदारी येत्या 5 वर्षांत संपादित करेल.