Edible Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची मागणी घटली, भारतामध्ये तेल स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या मागणीत घट झाल्याने त्याचा परिणाम हा भारतात दिसून येत आहे. देशात आज खाद्य तेलाच्या दरात अल्प प्रमाणात घसरण पहायला मिळत आहे.
मुंबई : देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला असताना, दुसरीकडे एक दिलासादायक बतमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या दरात (Edible Oil Price) घसरण झाल्याने त्याचा परिणाम हा देशातील खाद्य तेलाच्या किमतींवर देखील झाला असून, देशात खाद्या तेलाच्या भावात काहीशी घट झाल्याचे पहायला मिळत आहे. सोमवारी मोहरी (Mustard Oil Price), सोयाबीन, तीळ, आणि पाम ऑईलचे दर स्वस्त झाले आहेत. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार आंतराष्ट्रीय बजारात खाद्य तेलाची मागणी अचानक घटल्याने तेलाचे दर स्वस्त झाले आहेत. विशेष म्हणजे भारत हा खाद्य तेलाचा मोठा आयातदार देश आहे. गेल्या आठवड्यात मोहरी तेल आयातीमध्ये घट झाली असताना देखील मगणी कमी झाल्याने तेलाचे दर स्वस्त झाले आहेत.
इंडोनेशियातून तेल निर्यात बंद
इंडोनेशिया हा पाम तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. इंडोनेशियाकडून दरवर्षी भारताला मोठ्याप्रमाणात पाम तेलाची आयात होते. मात्र यंदा इंडोनेशियामध्ये महागाईचा भडका उडाला आहेत. सोबतच तेलाचा देखील तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीला बंदी घातली असून, तेथील निर्यातदारांवर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. आपण पाम तेलासाठी इंडोनेशियावर अवलंबून असल्याने तेला निर्यातीचा मोठा फटका हा भारताला बसला आहे. इंडोनेशियातून होणारी पाम ऑईलची निर्यात थांबल्याने आज जरी तेलाच्या दरात घसरण पहायला मिळत असली, तरी भविष्यात भाव वाढण्याची शक्यता आहे.
रशिया युक्रेन युद्धाचा फटका
ज्या प्रमाणे आपण इंडोनेशियाकडून पाम तेलाची आयात करतो, त्याचप्रमाणे आपण सुर्यफूलाच्या तेलासाठी युक्रेनवर अवलंबून आहोत. मात्र सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे युक्रेनमधून होणारी तेलाची निर्यात ठप्प झाली आहे. भारत युक्रेनकडून तब्बल 70 टक्के सुर्यफूल तेलाची आयात करतो. मात्र आता ही आयात देखील बंद असल्याने तेलाच्या आयातीसाठी अन्य पर्याय शोधण्याचे आवाहन देशासमोर असेल. अन्यथा भविष्यात तेलाचा तुटवडा जाणू शकतो.