Demonetization : धुळीस मिळाले दुश्मनांचे मनसुबे; नोटबंदीचा झाला असा फायदा
केंद्र सरकारने 2016 मध्ये 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा अवैध घोषीत केल्या. त्यावर बंदी आणली. या नोटा बँकेत जमा करण्यात आल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती समोर येईल. बोगस नोटांना पायबंद बसेल, असा दावा सरकारने केला होता, नोटबंदीला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. या नोटबंदीचा काय झाला फायदा?
मोदी सरकारच्या पहिल्याच कार्यकाळात नोटबंदीचा प्रयोग राबविण्यात आला. त्यावर देशभरात जोरदार मंथन झाले. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी मते मांडली. कोणी हा प्रयोग फसल्याचा दावा केला. तर काहींनी सीमेपलिकडील दुश्मनांना चपराक बसल्याचा गाजावाजा केला. 8 नोव्हेंबर 2016 रोजी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता नोटबंदीची घोषणा केली होती. त्याला 8 वर्षे उलटून गेले आहेत. या नोटबंदीचा खराच फायदा झाला का? काय लागले हाती, जाणून घेऊयात..
बनावट नोटांना पायबंद
- RBI च्या आकडेवारीनुसार बनावट नोटांना मोठा पायबंद घालणे नोटबंदीमुळे शक्य झाले आहे. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये 28.7 कोटी बनावट नोटा आढळल्या होत्या. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये हा आकडा 29.6 कोटी रुपये होता. तर आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 43.5 कोटी नकली नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.
- नोटबंदी 2016 मध्ये झाली होती. त्यानंतर बनावट नोटांना आळा घालण्यात मोठे यश आल्याचे आरबीआयच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. कोरोनानंतरच्या काळातील बनावट नोटांचे आकडे त्यासाठी आरबीआयने दिले आहेत. आर्थिक वर्ष 2023 मध्ये जवळपास 7.98 कोटी मूल्याच्या बनावट नोटा सापडल्या. आर्थिक वर्ष 2014 मध्ये हा आकडा 24.84 कोटी होता. त्यातुलनेत बनावट नोटांचे प्रमाण 68 टक्के कमी झाल्याचे दिसून येते.
सर्वाधिक 500 रुपयांच्या नकली नोटा
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ज्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये सर्वाधिक 500 आणि 100 रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सापडलेल्या एकूण बनावट नोटांमध्ये 500 रुपयांच्या 79,699 नोट होत्या. तर 92,237 नोट 100 रुपयांच्या होत्या. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 500 रुपयांच्या एकूण 91,110 नोट मिळाल्या. तर 100 रुपयांच्या 78,699 नोट प्राप्त झाल्या.
2000 रुपयांची पण बनावट नोट
नोटबंदी केल्यानंतर व्यवहार सुलभतेसाठी 2000 रुपयांची गुलाबी नोट आणण्यात आली होती. पण त्याची बनावट नोट तयार करण्यात आली. आरबीआयसाठी हा धक्का होता. आरबीआयला दोन हजारांची डुप्लिकेट नोट बाजारात येईल, असे वाटले नव्हते. कारण हा तात्पुरता प्रयोग होता. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण 13,604 नोट जप्त करण्यात आले होते. तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ही संख्या 9,806 इतकी होती.
डिजिटलकडे पाऊल
नोटबंदी काळातच भारतात डिजिटल व्यवहाराला सुरुवात झाली होती. नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. भारतीय अर्थव्यवस्था डिजिटलकडे वळाली. कॅशलेस पेमेंटसाठी अनेक प्रयोग सुरु झाले. युपीआय पेमेंट पद्धतीने अमुलाग्र बदल घडून आला.