Dhanteras Gold | सोन्यावर भारतीयांच्या उड्या, इतक्या टन सोन्याची केली खरेदी
Dhanteras Gold | धनत्रयोदशीला सोने-चांदीने दरवाढीची सलामी दिली. पण या दिवशी खरेदी शुभ मानण्यात येते. त्यामुळे या दरवाढीकडे कानाडोळा करत भारतीयांनी गोल्डन चान्स साधला. सोने-चांदीची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली. गेल्यावर्षी 2022 मध्ये सोने-चांदीत 25,000 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा तर हे सर्व रेकॉर्ड भारतीयांनी इतिहासजमा केले.
नवी दिल्ली | 11 नोव्हेंबर 2023 : धनत्रयोदशीला सराफा बाजारात धना धन धन वर्षाव झाला. सराफा बाजारात तसाही श्रीमंत असतो. पण धनत्रयोदशीला त्याची श्रीमंती आकाशाला पोहचते. भारतीयांनी दसऱ्यानंतर पुन्हा शुक्रवारी, धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत सोने-चांदीची लयलूट केली. दोन्ही धातू महाग झालेले असताना जमके खरेदी केली. गेल्यावर्षी 25,000 कोटी रुपयांची सोने-चांदी खरेदी झाली होती. यंदा ऑक्टोबर महिन्यात दोन्ही धातूत जवळपास 4 हजार रुपयांची दरवाढ झाली. त्यामुळे भारतीय ग्राहक मर्यादीत खरेदी करतील असा अंदाज बांधण्यात येत होता. तो सपशेल खोटा ठरला. खरेदीत भारतीयांनी सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले.
30,000 कोटींच्या सोने-चांदीची विक्री
ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोडा यांनी आकडेवारी समोर आणली आहे. त्यानुसार धनत्रयोदशीला सोने-चांदी आणि अन्य किंमती वस्तूंची भारतीयांनी लयलूट केली. भारतीय सराफा बाजारात 30,000 कोटींची उलाढाल झाली. यामध्ये सोने आणि सोन्याच्या दागदागिन्यांचा आकडा 27,000 कोटी रुपयांचा आहे. 3,000 कोटी रुपयांची चांदी आणि वस्तूंची विक्री झाली.
41 टन सोन्याची विक्री
2022 मध्ये सोन्याचा भाव 52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर आता हा भाव जवळपास 62000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदी गेल्या दिवाळीत 58000 रुपये किलो होती. यावर्षी चांदीचा भाव 72,000 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. धनत्रयोदशीला देशात जवळपास 41 टन सोने आणि जवळपास 400 टन चांदी, वस्तू आणि भाड्यांची विक्री झाली.
असा होता भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,240 रुपये, 23 कॅरेट 59,999 रुपये, 22 कॅरेट सोने 55,180 रुपये झाले. 18 कॅरेट 45,180 रुपये, 14 कॅरेट सोने 35,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदी घसरली. एक किलो चांदीचा भाव 70,416 रुपये झाला.
चांदीची रॉकेट भरारी
यावर्षी चांदी आणि सोन्याच्या किंमतींनी जवळपास 11 टक्क्यांची उसळी घेतली. पण सोन्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहक, खरेदीदारांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे त्यांनी चांदीकडे मोर्चा वळविला आहे. चांदीत येत्या काही दिवसांत मोठी तेजी दिसू शकते. चांदीची मागणी वाढली आहे. चांदीच्या किंमती 9-12 महिन्यात वाढून 85,000 ते 90,000 रुपये प्रति किलोवर पोहचतील, असा अंदाज आहे. त्यामुळे चांदीच्या किंमतीत 20 टक्क्यांची तेजी दिसून येईल.