नवी दिल्ली | 28 डिसेंबर 2023 : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा आज 28 डिसेंबर रोजी जन्मदिन. जर ते हयात असते तर आज 91 वर्षांचे असते. गुजरातमधील एका सर्वसाधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांची व्यावसायिक जगतातील सुरुवात एकदम कठिण होती. त्यांना हे साम्राज्य उभं करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. कुटुंबाकडे पैशांची चणचण होती. त्यामुळे त्यांना इयत्ता दहावीनंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांना नोकरीसाठी कमी वयातच यमनला जावे लागले. त्यांनी पेट्रोल पंपावर नोकरी केली. त्यांची व्यवसायाची बाराखडी पक्की होती. तावून सलाखून धीरजलाल हिराचंद नंतर धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) झाले.
500 रुपयांत कंपनीची स्थापना
खिशात 500 रुपये घेऊन धीरुभाई मुंबईत दाखल झाले. चंपकलाल दिमानी यांच्यासोबत त्यांनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून पश्चिमी देशात अद्रक, हळद आणि इतर मसाले पाठविण्याचे काम सुरु केले. भविष्यात काळात पॉलिस्टर कपड्यांची मागणी वाढणार हे हेरुन त्यांनी यामध्ये नशीब आजमावण्याचा विचार केला. त्यातूनच पुढे पेट्रोकेमिकल, रिफायनिंग, टेलिकॉम आणि इतर क्षेत्रात त्यांचा व्यवसाय वाढला.
आयुष्याचा सारीपाट
किती संपत्तीचे होते मालक
धीरुभाई अंबानी हे त्यांच्या काळात भारतातील सर्वात मोठे श्रीमंत होते. 2002 मध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला तेव्हा ते जगातील 138 वे श्रीमंत होते. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 2.9 अब्ज डॉलर इतकी होती. आताच्या डॉलर-रुपयात त्याचे मूल्य 24 हजार कोटी रुपये होते. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारातील भांडवल 17.50 लाख कोटी रुपये पोहचले आहे. तर त्यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य 60 हजार कोटी रुपेय होते.