या दिवाळीत गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणुकीचा मुहूर्त गाठता येईल. NSE आणि BSE दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी एक तासासाठी कमाईची संधी देतात. दिवाळीत शेअर बाजाराला सुट्टी असते. पण एक तासासाठी काही जणांना लक्ष्मी दर्शन घडते. दिवाळीत एक तासाच्या ट्रेडिंगची परंपरा अनेक दिवसांपासून सुरु आहे. या दिवशी शेअर बाजारात ट्रेडिंग करणे हे शुभ मानण्यात येते. अनेक दिग्गज गुंतवणूकदार हा मुहूर्त सहसा चुकवत नाहीत. या काळात लागलेली लॉटरी वर्षभर पुरते असा समज आहे. या दिवशी पण 15 मिनिटांचे प्री-मार्केट सेशन होते. या दिवशी एकूण एक तास 15 मिनिटं मुहूर्त ट्रेडिंग चालते.
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?
मुहूर्त ट्रेडिंग हा एक तासाचे शुभ व्यापारी सत्र मानण्यात येते. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा खास मुहूर्त साधल्या जातो. या दिवशी बाजारात केलेली गुंतवणूक शुभ मानण्यात येते. दिवाळीचा काळ कोणतेही नवीन काम करण्यासाठी शुभ मानण्यात येतो. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी केलेली गुंतवणूक वर्षभरासाठी शुभ मानण्यात येते. त्यामुळे एक तासाचा मुहूर्त ट्रेडिंग वर्षभराच्या समृद्धीसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी शुभ मानल्या जातो.
या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने मुहूर्त ट्रेडिंगची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. एनएसईने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सेशन 1 नोव्हेंबर 2024 रोजी, शुक्रवारी आयोजित करण्यात आले आहे. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ संध्याकाळी 6 ते 7 या काळापर्यंत असेल. या काळात गुंतवणूकदार शेअरची खरेदी आणि विक्री करू शकतील. 1 नोव्हेंबर रोजी नियमित व्यापारी सत्र होणार नाही. तर केवळ एका तासासाठीच शेअर बाजार उघडेल. 1 नोव्हेंबर रोजी प्री-ओपनिंग सेशनची वेळ संध्याकाळी 5:45 ते 6:00 या दरम्यान असेल.
Muhurat Trading मुळे मालामाल
मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांचा फायदा झाल्याचे दिसून येते. त्यांना पॉझिटिव्ह रिटर्न मिळाल्याचे समोर आले आहे. गेल्या 17 मुहूर्त ट्रेडिंग सेशनमधील 13 सेशनमध्ये गुंतवणूकदारांचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. 2008 मध्ये जागतिक मंदी असताना सुद्धा शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी 5.86 टक्के चढला. 2022 मध्ये शेअर बाजार (NSE आणि BSE) 24 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी 6.15 वाजता सुरु झाला आणि 7.15 वाजता बंद झाला. गेल्या दोन मुहूर्त सत्रात शेअर बाजारात तेजीचे सत्र दिसून आले. 2022 मधील मुहूर्त ट्रेडिंग वेळी बीएसई आणि एनएसईमध्ये प्रत्येकी 0.88 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. तर 2021 मध्ये दोन्ही निर्देशांकात 0.49 टक्क्यांची वाढ दिसून आली.