बिस्कीटही बुडालं, पार्ले 10 हजार कर्मचारी कमी करण्याच्या तयारीत
बाजारातील आर्थिक मंदी यासाठी कारणीभूत असून बिस्कीट विक्रीही घटली आहे. विक्री घटल्याने कंपनीला तोटा सहन करावा लागतोय, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे.
मुंबई : देशातील सर्वात मोठी बिस्कीट कंपनी पार्ले प्रोडक्ट्स (Parle biscuits) 8000 ते 10,000 कर्मचारी कमी करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनेच (Parle biscuits) याबाबत माहिती दिली आहे. बाजारातील आर्थिक मंदी यासाठी कारणीभूत असून बिस्कीट विक्रीही घटली आहे. विक्री घटल्याने कंपनीला तोटा सहन करावा लागतोय, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे.
जीएसटी कमी करण्याची मागणी
100 किलोपेक्षा कमी म्हणजे 5 रुपयांखालील बिस्कीट पॉकेटवरील जीएसटी कमी करावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. सरकारने हा निर्णय न घेतल्यास विविध ठिकाणचे आठ ते दहा हजार कर्मचारी कमी करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसेल. कारण, मंदीमुळे कंपनीवर बोजा वाढला आहे, अशी माहिती पार्ले प्रोडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयंक शाह यांनी एका मुलाखतीत बोलताना दिली.
10 हजार कोटी रुपयांची विक्री असलेल्या पार्लेकडून प्रसिद्ध पार्ले जी, मोनॅको आणि मारी ब्रँडचीही बिस्कीट तयार केली जातात. कंपनीकडून एक लाख कर्मचाऱ्यांना रोजगार दिला जातो. कंपनीचे स्वतःचे 10 प्लांट्स असून 125 थर्ड पार्टी निर्मिती सुविधा आहेत. पार्लेचे निम्म्यापेक्षा जास्त ग्राहक हे ग्रामीण भारतात आहेत.
जीएसटीनंतर बिस्कीट क्षेत्राला तोटा
5 रुपयांना विकला जाणारा बिस्कीट पुडा म्हणजेच, 100 रुपये प्रति किलो खालील बिस्किटांवर यापूर्वी 12 टक्के कर लावला जात होता. पण दोन वर्षांपूर्वी लागू झालेल्या जीएसटीमध्ये बिस्कीट 18 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये ठेवण्यात आलंय. यामुळे कंपन्यांना किंमत वाढवावी लागली आणि त्यामुळे विक्रीही घटली आहे. पार्लेनेही यानंतर 5 टक्क्यांनी किंमत वाढवली आणि त्यामुळे विक्री कमी झाली, असं मयंक शाह यांनी सांगितलं.
ब्रिटानियाचीही विक्री घटली
आणखी एक मोठी बिस्कीट निर्माता कंपनी ब्रिटानियाचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांनी क्षेत्रातील मंदीबाबत सांगितलं होतं. बिस्कीट क्षेत्रात सध्या परिस्थिती अशी झाली आहे, की लोक 5 रुपयांचा बिस्कीट पुडा घेण्यासाठीही विचार करत आहेत. ही अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर बाब असल्याचं बेरी म्हणाले.
आमची वाढ फक्त 6 टक्क्यांनी होत आहे, तर बाजाराची वाढ त्यापेक्षाही कमी असल्याचं वरुण बेरी यांनी ‘ईटी’शी बोलताना सांगितलं. नुस्ली वाडिया प्रमोटेड ब्रिटानियाचा नफा एप्रिल-जून 2019 या तिमाहीपर्यंत 3.5 टक्क्यांनी घटून व्यवहार वर्षानुवर्षे 249 कोटी रुपयांवर आलाय.