नवी दिल्ली : आयकर (Income Tax) भरण्यात भारतीय अद्यापही मागे आहेत. आर्थिक साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. प्रत्येक वस्तूवर कर भरत असताना उत्पन्नावर कर का द्यावा असा सवाल जनतेचा आहे. याबाबत केंद्र सरकारकडून (Central Government) व्यापाक जागरुकता मोहिम राबविण्यात येत नाही. उत्पन्नावरील कर का द्यावा लागतो, हा कर घेण्यामागील सरकारचा उद्देश काय? या कर संकलनातून कोणत्या योजनेसाठी किती रक्कम खर्च करण्यात येते, याची जाहीर वाच्यता होत नसल्याने, सर्वसामान्य जनतेला हा कर म्हणजे ओझेच वाटतो. हा कर न देण्याकडे आणि तर्क लावून त्यातून पळ काढण्याकडे भारतीयांचा कल असतो. एकूण किती भारतीय इनकम टॅक्स भरतात हे पाहिल्यास, हा आकडा धक्का देणारा आहे. त्याहून किती भारतीयांकडे करपात्र उत्पन्न (Taxable Income) आहे, हा ही संशोधनाचा विषय आहे.
भारतात केवळ 6% करदाते आहेत. यामधील 5.5% जणांवर शून्य कर लागतो. 2020-21 मध्ये करदात्याविषयीची आकडेवारी सार्वजनिक करण्यात आली होत. त्यानुसार, देशातील एकूण 132 कोटी लोकसंख्येपैकी 8.22 कोटी करदाते होते.
कर देणाऱ्या जनतेपैकी 7.5 कोटी करदाते शून्य कराच्या परिघात येतात. तर एक मोठा वर्ग तगडी कमाई करुनही त्यावर कर भरत नाही. कर चुकवेगिरी करतात. कर न देणाऱ्या या वर्गाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव नाही. त्यामुळे केंद्र सरकारच नाही तर अर्थशास्त्रज्ञही या मानसिकतेमुळे चिंताग्रस्त आहेत.
भारतात केवळ 1.5 कोटी करदात्यांच्या जीवावरच केंद्र सरकारचे प्राप्तिकर खाते कार्यरत आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 132 कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ 1.5 कोटी करदाते आहेत. हे प्रमाण किती कमी आहे, हे वेगळं सांगायला नको. अमेरिकेतील 60% जनता आयकर भरते. त्या तुलनेने भारताचा आकडा अगदीच नगण्य 6 टक्के आहे.
सर्वाधिक आयकर उत्तर प्रदेशातून जमा होतो. युपीतून 57,057 कोटी, बिहारमध्ये 31,990 कोटी, मध्यप्रदेशातून 24,968 कोटी, पश्चिम बंगालमधून 23,927 कोटी, महाराष्ट्रातून 20,092 कोटी, राजस्थानमधून 19,166 कोटी, तामिळनाडूमधून 12,974 कोटी तर आंध्रप्रदेशातून 12,872 कोटी रुपये आयकर जमा करण्यात येतो.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशातील श्रीमंतांबाबत राज्यसभेत उत्तर दिले होते. या आकडेवारीनुसार, देशात 2021-22 या काळात 10 लाखांहून अधिक आणि 1 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक कमाई करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. देशात असे 77 लाख लोक आहेत. तर वेल्थ हुरुन इंडिया-2021 च्या अहवालानुसार देशात एकाच वर्षात 7 कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 11 टक्के वाढ झाली. ही संख्या 4.58 लाख झाली आहे.