ट्रम्प यांच्या ट्विटमध्ये 102 शब्द, एका शब्दाने जगाचं 90 हजार कोटींचं नुकसान
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भूमिकेचे जागतिक स्तरावर काय परिणाम होतात याविषयी नेहमीच चर्चा होत असते. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटनेही हे पुन्हा अधोरेखित केले. ट्रम्प यांनी ट्विट केल्यानंतर जागतिक बाजाराचे जवळजवळ 1.36 लाख कोटी डॉलर बुडाले. ट्रम्प यांच्या या ट्विटमध्ये केवळ 102 शब्द होते. या प्रमाणे ट्रम्प यांच्या ट्विटमधील प्रत्येक शब्दामुळे जागतिक […]
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भूमिकेचे जागतिक स्तरावर काय परिणाम होतात याविषयी नेहमीच चर्चा होत असते. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटनेही हे पुन्हा अधोरेखित केले. ट्रम्प यांनी ट्विट केल्यानंतर जागतिक बाजाराचे जवळजवळ 1.36 लाख कोटी डॉलर बुडाले. ट्रम्प यांच्या या ट्विटमध्ये केवळ 102 शब्द होते. या प्रमाणे ट्रम्प यांच्या ट्विटमधील प्रत्येक शब्दामुळे जागतिक बाजाराचे सरासरी 13 अरब डॉलरचे (जवळजवळ 90 हजार कोटी रुपयांचे) नुकसान झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या 200 अरब डॉलरच्या उत्पादनांवर आयात कर वाढवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर हा परिणाम पाहायला मिळाला.
ट्रम्प यांनी चीनसोबतच्या व्यापारी संबंधांवर भाष्य करताना चीनी वस्तुंवर आयात कर वाढवण्याचा इशारा दिला होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते, “मागील 10 महिन्यांपासून चीन 50 अरब डॉलरच्या हायटेक वस्तुंवर 25 टक्के आणि 200 अरब डॉलर किमतीच्या अन्य वस्तुंवर 10 टक्के कर अमेरिकेला देत आहे. याचा थेट परिणाम आमच्या आर्थिक परिणामांवर होत आहे. आता हा 10 टक्के कर शुक्रवारपासून वाढून 25 टक्के होईल. चीनला पाठवल्या जाणाऱ्या 325 अरब डॉलरच्या अतिरिक्त वस्तुंवर कोणताही टॅक्स लागत नाही. मात्र, आता त्यांच्यावर देखील 25 टक्के कर लागेल. चीनसोबत व्यापारविषयक चर्चा सुरु आहेत, मात्र, त्याचा वेग अत्यंत कमी आहे.”
जागतिक बाजारात मोठी पडझड
ट्रम्प यांच्या या घोषणेने जागतिक बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. त्यानंतर बाजारात अनेक चढउतार आले. शिकागो बोर्ड ऑप्शन एक्सचेंज (CBOE) वोल्टेलिटी एक्सचेंजमध्ये याआधी मागील 2 दिवसात 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. त्यामुळे जानेवारीत पहिल्यांदाच आकडेवारी 20 पर्यंत पोहचली. अशाप्रकारे बाजारात चांगलेच चढउतार आले. आजही सुरुवातीला आशियातील बाजारात घट झालेली दिसली.
चीन-अमेरिकेतील तणाव कायम
ट्रम्प यांच्या या ट्विटनंतर अमेरिका आणि चीनमधील तणाव कमी होण्याच्या सर्वच शक्यता मावळल्या. दोन्ही देश चर्चेतून योग्य मार्ग काढतील असा विश्वास होता तोपर्यंत जागतिक बाजार स्थिर होता. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि अमेरिकेतील व्यापारासंबंधित चर्चेवर सकारात्मक संकेत दिले होते. ट्रम्प म्हणाले होते, “चीनचे अधिकारी या आठवड्यात ‘व्यापार करार’ करण्यासाठी अमेरिकेला येत आहेत.” मात्र, स्थिती सामान्य होण्याची शक्यता असतानाच ट्रम्प यांच्या ट्विटने सर्व शक्यता मावळल्या आणि बाजार कोलमडला.
For 10 months, China has been paying Tariffs to the USA of 25% on 50 Billion Dollars of High Tech, and 10% on 200 Billion Dollars of other goods. These payments are partially responsible for our great economic results. The 10% will go up to 25% on Friday. 325 Billions Dollars….
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 5, 2019
जर ट्रम्प यांनी शुक्रवारपासून चीनच्या 200 अरब डॉलर उत्पादनांवर आयात कर 10 वरुन 25 टक्के केला, तर अमेरिका-चीनमधील व्यापारात मोठी घट होईल. याचा परिणाम जागतिक स्तरावरही पाहायला मिळेल.