Elon Musk Salary : 7 वर्षानंतर एलॉन मस्क याला मिळणार पगार; Tesla देणार इतक्या लाख कोटींचा मेहनताना
Elon Musk Tesla Package : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या वेतनाचा प्रश्न एकदाचा मार्गी लागला आहे. गेल्या 2018 पासून पगाराचा पेच होता. गेल्यावेळी मस्क याने विषयी जाहीर नाराजी पण व्यक्त केली होती. गुंतवणूकदारांनी त्याच्या प्रस्तावित पॅकेजच्या बाजूने मतदान केले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क याला पगाराची लॉटरी लागली आहे. त्याच्या संपत्तीत जबरदस्त भर पडणार आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. पण वर्ष 2018 पासून त्याच्या पगाराचा पेच काही केल्या सुटत नव्हता. गुंतवणूकदारांचे त्याच्या पगारावर एकमत होत नव्हते. पण कंपनीत त्याच्याकडे मोठे शेअर असल्याने तो जगातील श्रीमंतांच्या यादीत अग्रेसर होता. आता गुंतवणूकदारांनी त्याच्या प्रस्तावित पॅकेजच्या बाजूने मतदान केले आहे. त्याचा पगाराचा आकडा पाहुन डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत.
कंपनीच्या सर्वसाधारण बैठकीत निर्णय
टेस्ला कंपनीच्या शेअरधारकांची वार्षिक सर्वसाधारण बैठक दोन दिवसांपूर्वी झाली. ब्लूमबर्गनुसार, या बैठकीत गुंतवणूकदारांनी एलॉन मस्क यांच्या वार्षिक पगाराच्या प्रस्तावावर मोहोर लावली. त्या बाजूने गुंतवणूकदारांनी मतदान केले. कंपनीचे रजिस्ट्रेशन टेक्सासला हलविण्याचा प्रस्ताव पण मंजूर झाला. इलेक्ट्रिक वाहन निर्मिता कंपनी टेस्लाकडून मस्क याला 56 अब्ज डॉलर म्हणजे 4.68 लाख कोटी रुपयांचे वेतन मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
2018 पासून अडकला होता प्रस्ताव
2018 पासून एलॉन मस्क याच्या वार्षिक पॅकेजचा प्रस्ताव वादात अडकला होता. गुंतवणूकदारांमध्ये आणि मोठ्या शेअरहोल्डर्समध्ये हे पॅकेज किती असावे आणि ते कोणत्या स्वरुपात असावे यावरुन वाद सुरु होता. सध्याच्या मंजूर झालेल्या वेतनाचा प्रस्ताव हा 2018 मध्येच तयार करण्यात आला होता. पण तेव्हा त्याला मंजूरी देण्यात आली नाही. समूहातील गुंतवणूकदार इतक्या मोठ्या वेतनाला मंजूरी देण्यास सहमती देत नव्हते. पण अखेरीस हा प्रस्ताव मंजूर झाला.
संचालक मंडळाकडे केली ही मागणी
एलॉन मस्क याने संचालक मंडळाकडे यापूर्वीपासूनच त्याच्या काही मागण्या ठेवल्या होत्या. कमीत कमी 25 टक्के वाटा त्यांनी मागितला होता. त्यासाठी संचालक मंडळाला त्याने मोठी मुदत दिली. जर मागणी मान्य झाली नाही तर कंपनी सोडण्याचा इशारा पण मस्कने दिला होता. अखेर संचालक मंडळाने त्याची मागणी मान्य केली. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास 4.68 लाख कोटी रुपये होते.