भारताला वळसा घालून Elon Musk थेट चीनमध्ये; भारताला काय दिला संदेश
Elon Musk China Visit : Reuters या जागतिक वृत्तसंस्थेनुसार, जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क याने रविवारी अचानक चीनला भेट दिली. त्यापूर्वी तो भारत दौऱ्यावर येणार होता. त्याने याविषयीची माहिती त्याच्या एक्स हँडलवरुन दिली होती. पण त्याने हा दौरा अचानक रद्द केला. चीन दौऱ्यातून त्याने भारताला काय संदेश दिला?
Tesla या इलेक्ट्रिक कारचा सीईओ आणि अब्जाधीश एलॉन मस्क याने चीनला रविवारी अचानक भेट दिली. एक आठवड्यापूर्वी तो भारताच्या दौऱ्यावर येणार होता. त्याविषयीची माहिती त्याने एक्स हँडलवरुन दिली होती. पण त्याने अचानक हा दौरा रद्द केला. टेस्लाच्या तिमाही निकाल आणि महत्वपूर्ण बैठकीमुळे हा दौरा रद्द केल्याचे कारण त्याने दिले होते. चीन हा जगातील इलेक्ट्रिक कारची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यादृष्टीने मस्क याचा हा चीन दौरा महत्वाचा मानण्यात येत आहे. दोन अधिकाऱ्यांच्या माहिती आधारे रॉयटर्स या वृत्त संस्थेने हे वृत्त दिले आहे.
पंतप्रधान मोदींशी होणार होती भेट
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एलॉन मस्क 21-22 एप्रिल रोजी भारत भेटीवर येणार होता. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होता. त्यानंतर तो टेस्लाच्या भारतातील प्रवेशाविषयीची घोषणा करणार होता. 10 एप्रिल रोजी मस्क याने स्वतः एक्सवर पोस्ट करुन नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेण्यास उत्सूक असल्याचे म्हटले होते. मस्क दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत होता. यावेळी पंतप्रधानांशी भेट, स्टार्टअप्स आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गजांच्या भेटीचा कार्यक्रम ठरला होता. पण हा दौराच रद्द झाला.
चीनमध्ये स्वयंचलित वाहनांची एंट्री
- चीन हा जगातील दुसरा सर्वात मोठा इलेक्ट्रिक वाहन वापरकर्ता देश आहे. अमेरिकेत टेस्लाला रस्त्यावरुन स्वंयचलित इलेक्ट्रिक कार चालविण्याची परवानगी काही राज्यात मिळालेली आहे. तर एका अपघाताचा खटला या कंपनीविरोधात सुरु आहे. आता चीनमध्ये स्वयंचलित (Full Self Driving-FSD) इलेक्ट्रिक कार उतरविण्यासाठी टेस्ला प्रयत्न करत आहे. त्यासंबंधीचे चीनी सॉफ्टवेअर विकसीत करण्यात येणार आहे. अलगोरिदम आधारे जो डेटा चीनमधून गोळा करण्यात आला आहे. तो हस्तांतरीत करण्यासंबंधीची परवानगी प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी एलॉन मस्कने हा धावता दौरा केल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
- एलॉन मस्क याने एक्स प्लॅटफॉर्मवर टेस्ला ही चीनमध्ये एफएसडी हे तंत्रज्ञान चीनमध्ये लवकरच उपलब्ध करुन देणार असल्याचा दावा केला आहे. हा दौरा सार्वजनिक करण्यात आला नाही, कारण काही परवानग्या अजून टेस्लाला मिळालेल्या नाहीत.
भारताला काय संदेश
भारतात दौऱ्याची घोषणा करताना, भारतासोबत दक्षिण आशिया आणि पूर्वोत्तर आशियावर मस्कचा डोळा होता. पण भारतात सध्या निवडणुकीचे वारे सुरु आहे. तर टेस्लाच्या तिमाही निकालासंदर्भातील बैठकांचे सत्र असल्याचे कारण पुढे करत मस्कने हा दौरा टाळला. पण त्याने या वर्षाअखेरीस भारतात येण्याची घोषणा केलेली आहे. भारतातही काही परवानग्या आणि सवलतीसाठी टेस्लाचे घोडे अडलेले आहे.