बॉसवर टीका पडली महागात; एलन मस्क यांच्या कंपनीतून कर्मचाऱ्यांना नारळ, काय म्हटले होते ‘त्या’ पत्रात?
एलन मस्क यांच्यावर टीका करणे कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. टीका करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे.
कॉर्पोरेट जगतात एक म्हण आहे, ‘बॉस इज ऑलवेज राईट’ म्हणजेच बॉस जे बोलेल तीच कर्मचाऱ्यांसाठी पूर्व दिशा असते. बॉसच्या निर्णयाविरोधात कोणतीही टीका केल्यास त्याचा परिणाम चांगला होत नाही. प्रसंगी तुम्हाला तुमची नोकरी (Job) देखील गमवावी लागते. असाच काहीसा प्रकार घडलाय एलन मस्क (Elon Musk) यांच्या SpaceX या कंपनीमध्ये. कर्मचाऱ्यांनी एलन मस्क यांच्या व्यवहारावर टीका करणारे एक खुले पत्र लिहीले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने माहिती दिली आहे. मात्र किती कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले याचा अद्याप खुलासा होऊ शकलेला नाही. कर्मचाऱ्यांनी एलन मस्क यांच्या काही ट्विटवर (Tweet) टीका केली होती. अशा प्रकारच्या ट्विटमुळे कंपनीच्या प्रतिमेला तडा जात असल्याचे या पत्रात म्हटले होते. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण
SpaceX मधील काही कर्मचाऱ्यांनी एलन मस्क यांच्या निर्णयावर टीका करणारे एक खुले पत्र लिहीले होते. या पत्रातून मस्क यांच्यावर टीका करण्यात आली होती. तसेच मस्क यांच्या काही ट्विटमुळे कंपनीच्या प्रतिमेला तडा जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना कंपनीच्या वतीने मेल पाठवण्यात आला आहे. या मेलमध्ये म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांची ही भूमिका व्यवस्थापनाला आवडली नाही. कर्मचाऱ्यांनी आपली लाईन क्रॉस केल्याचे व्यवस्थापनला वाटते. याबाबत न्यूयॉर्क टाइम्सच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर येत आहे. मात्र नेमके किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढले याबाबत अद्याप खुलासा होऊ शकलेला नाही.
मस्क यांचा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी संवाद
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. या संवादादरम्यान त्यांना कर्मचाऱ्यांनी कर्मचारी कपातीबाबत प्रश्न विचारला होता. यावर मस्क यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. मात्र यावेळी बोलताना मस्क यांनी म्हटले की, सध्या कंपनी तोट्यात आहे, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत आहे. खर्च कमी करण्यासाठी काही पाऊले उचलावी लागणार आहेत, त्यामध्ये कर्मचारी कपातीसारखा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. मस्क यांच्या या इशाऱ्यानंतर ट्विटरच्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.