EPFO ATM Card : ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता, लवकरच ATM मिळणार, जूनपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट होणार, असा फायदा होणार
EPFO ATM Card And Mobile App : केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मंडाविया यांनी ईपीएफओ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. EPFO 3.0 सुरू होताच ईपीएफओ सदस्यांना ATM कार्ड देणार आहे. जानेवारी 2025 पासून सिस्टिममध्ये सुधारणेस सुरुवात होईल.
ईपीएफ खातेदारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसूख मंडाविया यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार, कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) यांनी यावर्षी जूनपर्यंत त्यांच्या नवीन सॉफ्टवेअर सिस्टिम EPFO 3.0 सुरू होताच ईपीएफओ सदस्यांना ATM कार्ड देणार आहे. जानेवारी 2025 पासून सिस्टिममध्ये सुधारणेस सुरुवात होईल. ही नवीन सिस्टिम देशातील बँकिंग सिस्टिमसारख्या सुविधा देईल. तर सोबतच वेबसाईटचा इंटरफेस अधिक युझर्स फ्रेंडली असेल.
लवकरच सदस्यांना एटीएम कार्ड
केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, EPFO 3.0 चे लॉचिंग लवकरच होईल. त्यात सदस्यांना ATM Card देण्यात येतील. त्यासाठी ईपीएफओच्या वेबसाईट आणि सिस्टिममध्ये या जानेवारीपासून सुधारणा सुरू होतील. सुरूवातीचा टप्पा याच महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. या सुधारणांमुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर त्यांच्या गरजेनुसार, पैसे काढता येतील. त्यांना खात्याची अपडेट कळेल. निवृत्ती फंडसंदर्भात पेन्शनधारकांना अधिक सुविधा देण्यात येतील.
कसं काम करणार ही सिस्टिम ?
स्पेशल डेबिट कार्ड : EPFO सदस्यांसाठी डेबिट कार्ड आणणार आहे. हे डेबिट कार्ड त्यांच्या पीएफ खात्याशी जोडलेले असेल.
थेट रक्कम काढणे : या कार्डच्या मदतीने सदस्य कोणत्याही एटीएमवर जाऊन PF खात्यातील रक्कम थेट काढू शकतील. ही प्रक्रिया बँक खात्याविना सहज पूर्ण करता येईल.
अर्ज करण्याची झंझट नाही : सध्या PF खात्यातून रक्कम काढण्यासाठी अगोदर ऑनलाईन क्लेम अर्ज दाखल करावा लागतो. पण नवीन सिस्टिम अंतर्गत ही प्रक्रिया खूप सोपी आणि सुकर होईल. सदस्यांना त्यांना गरज असेल तेव्हा लागलीच पैसे काढता येईल.
केव्हा काढता येईल तुम्हाला पैसा?
पीएफ खात्यातून एटीएमच्या माध्यमातून रक्कम काढण्यात येईल असे वृत्त नोव्हेंबरमध्ये समोर आले होते. ईपीएफओ सदस्याला त्याच्या पीएफ खात्यातील जमा रक्कमेतील 50 टक्के रक्कम काढण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. आता पीएफ खात्यातून एटीएमद्वारे रक्कम काढण्याची सुविधा मे ते जून 2025 या काळात देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. EPFO 3.0 लागू झाल्यानंतर कर्मचार्यांना एटीएममधून पीएफ काढता येईल.