EPFO Share Market : शेअर बाजारात वाढणार पीएफचा शेअर! ईपीएफओचा प्लॅन काय
EPFO Share Market : कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी जमा केलेला पैसा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात येणार आहे. आता त्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे. याविषयीचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावरुन पुन्हा वादंग होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : पगारदारांचे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेत खाते असतेच. कर्मचाऱ्यांच्या पगारातील 12% वाटा EPFO मध्ये जमा होता. पण तुम्हाला माहिती आहे का, या पैशांचे ईपीएफओ काय करते? EPFO, कर्मचाऱ्यांचा हा पैसा विविध ठिकाणी गुंतवणूक करते. या गुंतवणूकीतून होणारा फायदा ईपीएफओ, व्याजाच्या रुपाने कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करते. आतापर्यंत ईपीएफओ पारंपारिक गुंतवणूक योजना, सरकारी बाँड यामध्ये गुंतवणूक करुन कमाई करत होते. पण त्यावर एका मर्यादेबाहेर फायदा होत नसल्याने शेअर बाजारात (Share Market) गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात आला. ईपीएफओने एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे ETF मधून रक्कम काढून ती शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. ही रक्कम अधिक असेल. त्यासाठी ईपीएफओने केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
काय आहे प्रकरण
EPFO खातेदारांच्या खात्यातील रक्कम विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवते. या गुंतवणुकीतून होणारी कमाई खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम म्हणून जमा करण्यात येते. केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यासाठी खास नियम तयार केले आहेत. त्यानुसार, इकोनॉमिक्स टाईम्समधील रिपोर्टनुसार, EPFO ने अर्थ मंत्रालयाला याविषयीचे उपाय सुचवले आहेत.
नियमात बदलाची मागणी
शेअर बाजारात अस्थिरता असली तरी इक्विटी रिटर्न चांगले मिळतात. दीर्घ कालीन गुंतवणुकीवर मोठा फायदा मिळतो. ईपीएफओ 5 ते 15 टक्के वाटा इक्विटी आणि यासंबंधीच्या फंड्समध्ये गुंतवणूक करु शकते. त्यासाठी या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी ईपीएफओने अर्थमंत्रालयाकडे केली आहे.
ETF मध्ये किती केली गुंतवणूक
EPFO ने 2022-23 मधील एप्रिल-जुलै या दरम्यान ETF मध्ये 13,017 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. EPFO ने वर्ष 2022-23च्या दरम्यान ईटीएफमध्ये 53081 कोटी रुपये, वर्ष 2021-22 मध्ये 43,568 कोटी रुपये आणि वर्ष 2020-21 मध्ये 32,071 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
किंचित वाढला व्याजदर
ईपीएफओने (EPFO) आर्थिक वर्ष 2022-23 साठी 8.15 टक्के व्याज दर जाहीर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने नुकतीच या निर्णयाला मंजूरी दिली. एक परिपत्रक काढून ईपीएफओने त्याची माहिती दिली. लवकरच व्याजाची रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एसएमएसद्वारे जाणून घ्या रक्कम
पीएफ खात्यात सध्याच्या घडीला किती रक्कम आहे, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन माहिती करुन घेऊ शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाइप करावे आणि मराठी MAR लिहावे. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळेल.