एक्झिट पोल 2024 : निकालाच्या अंदाजावर बाजाराचा कोणता ‘खेळ’; गेल्या 20 वर्षांत शेअर बाजाराची अशी रिॲक्शन
Exit Polls 2024 : 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठीचे सातव्या टप्प्यातील मतदान पार पडेल. 4 जून रोजी निकाल लागेल. तर 3 जून रोजी एक्झिट पोलचा पोळा फुटेल. त्याचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल, हे समोर येईल.
लोकसभा निवडणूक 2024 निवडणुकीसाठी आज 1 जून रोजी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान होत आहे. 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागेल. तर 3 जून रोजी एक्झिट पोलचा पोळा फुटणार आहे. या एक्झिट पोलचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून येईल. 2004 पासून ते 2019 मधील लोकसभा रणसंग्रामापर्यंत शेअर बाजारावर एक्झिट पोलचा कसा परिणाम झाला हे आकडेवारीवरुन समोर येते. त्या त्यावेळी शेअर बाजाराने काय प्रतिक्रिया दिली ते आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
वर्ष 2004 मधील निवडणुकीत एक्झिट पोलचा परिणाम
वर्ष 2004 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या. शेवटचा टप्पा 10 मे रोजी झाला. त्यानंतर जवळपास 5 एक्झिट पोल समोर आले. यामधील तिघांनी बहुमत मिळणार नसल्याचे भाकीत केले होते. तर दोघांनीच एनडीएला पूर्ण बहुमत मिळण्याचा दावा केला होता. 11 मे रोजी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये घसरण झाली. 10 मे रोजी सेन्सेक्स 5,555.84 अंकावर बंद झाला होता. दुसर्या दिवशी बीएसई निर्देशांक 5,325.90 वर थांबला. त्यात 229.94 अंकांची घसरण आली. गुंतवणूकदारांना 4.14 टक्के नुकसान झाले.
वर्ष 2009 च्या एक्झिट पोलमुळे काय घडले
वर्ष 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा 13 मे रोजी होता. संध्याकाळी एक्झिट पोल आले. यामध्ये युपीएला 190 ते 200 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत होता. तर एनडीएला 180 ते 195 जागा मिळण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. याचा अर्थ बहुमत कुणा एकाच्या पारड्यात नव्हते. यावेळी शेअर बाजाराने अशी प्रतिक्रिया दिली.
13 मे 2009 रोजी सेन्सेक्स 12,019.65 अंकांवर बंद झाला. तर त्यानंतर तो 11,872.91 अंकांपर्यंत खाली घसरला. त्यात 146.74 अंकांची घसरण दिसली. तर निफ्टी 3,635.25 अंकावरुन 3,593.45 अंकापर्यंत खाली घसरला. त्यात 41.8 अंकांची घसरण दिसली.
2014 मध्ये भाजपचे सरकार, काय परिणाम
2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आले. 12 मे रोजी शेवटचा टप्पा झाला होता. त्यानंतर एक्झिट पोलचे आकडे आले. प्रत्येक एक्झिट पोलने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपची गुढी उभारली होती. झाले ही तसेच नरेंद्र मोदी केंद्रात पंतप्रधान झाले. बहुमताने भाजपचे सरकार आले. 12 मे रोजी सेन्सेक्स 23,551 अंकावर बंद झाला. त्यानंतर 13 मे रोजी सेन्सेक्समध्ये 320.23 अंकांची उसळी दिसली. तर निफ्टी 7,014.25 अकांहून 7,108.75 अंकांवर पोहचला. निफ्टीत 1.35 टक्के म्हणजे 94.5 अंकांची वाढ दिसून आली.
वर्ष 2019 मध्ये शेअर बाजारात तुफान तेजी
वर्ष 2019 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात मोठे बदल झाले. नोट बंदी झाली होती. बालाकोट हल्ला झालेला होता. सर्जिकल स्ट्राईकची तुफान चर्चा झाली होती. त्यामुळे देशात एकांगी लहर दिसून आली. या निवडणुकीचा शेवटचा टप्पा 17 मे 2019 रोजी झाला होता. या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 350 जागा मिळतील, असा एक्झिट पोलचा अंदाज होता.
एक्झिट पोल आल्याच्या दोन दिवसांत शेअर बाजारात तुफान तेजी दिसून आली. शेअर बाजार 4 टक्क्यांनी वधारला. 17 मे रोजी सेन्सेक्स 37,930.77 अंकावर होता. तर 20 मे रोजी त्यात 1,421.9 अंकांची तेजी दिसून आली. सेन्सेक्स 39,352.67 अंकावर आला. तर निफ्टीत 20 मे रोजी 421.1 अंकांची तेजी दिसली. निफ्टी 11,828.25 अंकांवर बंद झाला.