FASTag | उरला अवघा एकच दिवस, नाहीतर होणार नुकसान, अपडेट करा फास्टटॅग
FASTag | फास्टटॅगसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. फास्टटॅग ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी आहे. त्यापूर्वी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि अवघ्या काही मिनिटांची आहे. त्यामुळे चारचाकी वाहनधारकांचा मनस्ताप टळेल.
नवी दिल्ली | 30 January 2024 : जर तुम्ही फास्टटॅगचे केवायसी पूर्ण केले नसेल तर लवकरात लवकर केवायसी पूर्ण करा. तुम्ही विना केवायसी फास्टटॅग 31 जानेवारी नंतर वापरु शकणार नाही. कारण तो बॅकलिस्ट होईल अथवा तो डिएक्टीवेट करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) याविषयीचा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी नसलेले फास्टटॅग 31 जानेवारीनंतर रद्द करण्यात येतील. वाहनधारकांना एक वाहन, एक फास्टटॅगचा वापर करावा लागणार आहे. यासंदर्भात घोटाळे उघडकीस आल्यानंतर एनएचएआयने हा निर्णय घेतला आहे. तर ग्राहकांना नवीन घेतलेल्या फास्टटॅगसाठी केवायसी करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
मग भरा दुप्पट टोल
जर फास्टटॅगच अपडेट केले नाही तर वाहनधारकांना टोल नाक्यावर दुप्पट कर मोजावा लागेल. NHAI ने नजीकच्या टोलनाक्यावर याविषयीची अपडेट घेण्यास सांगितले आहे. पण तुम्ही या टेक्नोसॅव्ही युगात गुगलवर जाऊन यासंबंधीची माहिती घेऊ शकता. NHAI च्या फास्टटॅग विभागात यासंबंधीची सूचना आणि इतर अपडेट तुम्हाला माहिती करुन घेता येईल. सिंगल फास्टटॅगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कशामुळे घेतला हा निर्णय
NHAI ने आरबीआयच्या शेऱ्यानंतर हे पाऊल टाकले. एकच फास्टटॅग अनेक वाहनांसाठी वापर करण्यात येत असल्याचे समोर आले होते. तर विना केवायसी अनेक फास्टटॅग बाजारात विक्री केल्याचे समोर आले होते. काही ठिकाणी फास्टटॅग घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनेक वाहनांसाठी एकच फास्टटॅगचा वापर आणि एका खास वाहनासाठी अनेक फास्टटॅगचा वापर बंद करण्यात येणार आहे. असे सर्व फास्टटॅग आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आता मनस्ताप टाळण्यासाठी सर्वात अगोदर त्यांच्या फास्टटॅगची केवायसी करुन घ्यावी. तरच त्यांचे फास्टटॅग सक्रिय राहणार आहे. याविषयीचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.
8 कोटी वाहन चालक करतात वापर
देशभरात 8 कोटी वाहन चालक फास्टटॅगचा वापर करतात. या नवीन इलेक्ट्रिक कर प्रणालीमुळे, कर संकलानाचा वेग तर वाढलाच आहे. पण त्यात सूसुत्रता पण आली आहे. पण त्यातही काही पळवाटा आणि घडबड होत असल्याची शंका आल्यानंतर आता नवीन निर्देश देण्यात आले आहे. काही दिवसांनी फास्टटॅगऐवजी वाहन क्रमांकाआधारेच कर संकलनाचे तंत्रज्ञान आणण्याचा मनोदय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी बोलून दाखवला आहे.
अशी आहे सोपी पद्धत
- बँकेशी जोडलेल्या फास्टॅग वेबसाईटवर जा
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांकचा वापर करुन लॉग इन करा
- मोबाईलवर आलेला ओटीपी टाका
- माय प्रोफाईलवर जाऊन केवायसी टॅबवर क्लिक करा
- पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरा
- केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल
- fastag.ihmcl.com या साईटवर फास्टटॅग स्टेट्स चेक करा