Share Market FPI : बजेटपूर्वीच परदेशी पाहुण्यांचा अविश्वास! या निर्णयामुळे शेअर बाजाराला ताप
Share Market FPI : परदेशी पाहुण्यांनी बजेटपूर्वीच भारतीय बाजारावर अविश्वास दाखविल्याने चिंतेचे वातावरण आहे.
नवी दिल्ली : परदेशी पाहुण्यांनी बजेटपूर्वीच भारतीय शेअर बाजारावर (Share Market) अविश्वास दाखविला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, मुद्दे यांचा परिणाम तर आहेच. पण भारतीय बाजारातही त्यांना राम सपडत नसल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. या जानेवारी महिन्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) शेअर बाजारातून 17,000 कोटी रुपये काढले आहेत. चीनच्या शेअर बाजाराचं आकर्षण, भारतीय अर्थसंकल्पाविषयीचे (Union Budget 2023) ठोकताळे आणि अमेरिकने केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हच्या धोरणाविषयी सतर्कतेमुळे त्यांनी हा पाऊल टाकले आहे. 27 जानेवारीपर्यंत एफपीआयने बाजारातून 17,023 कोटी रुपयांची विक्री केली आहे. अर्थात शेअर बाजारातून पैसा काढून घेतला आहे. या महिन्यात एफपीआयाने कर्ज आणि बॉंडमध्ये 3,685 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारतासारखंच इंडोनेशियाच्या बाजारावरही परदेशी पाहुण्यांनी अविश्वास दाखवला आहे.
बजेटपूर्वीच गुंतवणूकदार सतर्क झाले आहे. दुसरीकेड अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक आहे. त्यात पुन्हा कडक धोरण स्वीकारण्याची चर्चा असल्याने एफपीआयने विक्रीचा धडका लावला. 31 जानेवारी रोजी फेडरल रिझर्व्हची बैठक होत आहे.
निर्बंध शिथिल झाल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी चीनच्या बाजारावर लक्ष केंद्रित केले आहे. भारत आणि इंडोनेशियातील बाजारातून रक्कम काढून परदेशी पाहुणे हा पैसा चीन, हॉंगकाँग, दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये गुंतवत आहेत.
यापूर्वी एफपीआयने डिसेंबर महिन्यात भारतीय बाजारावर विश्वास दाखविला होता. डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी 11,119 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर नोव्हेंबर 2022 मध्ये 36,239 कोटी रुपये ओतले होते. गेल्या वर्षी 2022 मध्ये परदेशी पाहुण्यांनी भारतीय शेअर बाजारात 1.21 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
गेल्या दोन वर्षांत परदेशी पाहुण्यांनी विक्रीचा सपाटा लावला. सलग 9 महिने परदेशी पाहुण्यांनी बाजारातून निव्वळ पैसे काढले. तर जुलैमध्ये FPIs ने निव्वळ खरेदी केली. 2022 मधील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) जुलैमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती.
या अगोदर गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून परदेशी पाहुणे सातत्याने त्यांच्याकडील शेअरची विक्री करत होते. ऑक्टोबर 2021 ते जून 2022 दरम्यान, त्यांनी भारतीय इक्विटी मार्केटमध्ये तब्बल 2.46 लाख कोटी रुपये काढले.
जगातील केंद्रीय बँकांचे व्याजासंबंधीचे कडक धोरण, आक्रमक व्याजवृद्धी, कच्चा तेलातील चढउतार, रशिया-युक्रेन युद्ध यामुळे एफपीआयने अनेकदा आक्रमक होत भारतीय बाजारातून रक्कम काढून घेतली.