कमाईची संधी घालवू नका… ‘या’ सहा मोठ्या कंपन्यांचे IPO होणार लाँच
IPO : 65 कंपन्यांनी 2021मध्ये आपल्या आयपीओंमधून तब्बल 1 लाख 35 हजार कोटी जमा केले आहेत, एका वर्षात सर्वाधिक निधी उभारण्याचा हा विक्रम होता. पुढील महिन्यातही सहा मोठ्या कंपन्या आपला आयपीओ लाँच करणार आहेत.
IPO : जर तुम्ही आयपीओ मार्केटमधून कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पुढील महिन्यात भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ते बायजुस (BYJU’S) अशा अनेक कंपन्या आपले आयपीओ लाँच (launch) करणार आहेत. 2021 हे मार्केटमधून पैसा उभारण्यासाठीचे सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. 2021मध्ये, 65 कंपन्यांनी आपल्या आयपीओतून 1 लाख 35 हजार कोटी जमा केले आहेत, हाच कल पाहता, ज्या कंपन्यांना आता नव्याने बाजारात उतरायचे आहे, अशाच कंपन्यांमधील आयपीओ बाजारात तेजी दिसण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. पुढील महिन्यात बहुप्रतिक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळसह अनेक मोठ्या कंपन्या बाजारात प्रवेश करतील अशी अपेक्षा आहे. आयपीओ उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाही. कंपन्यांनी आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे सादर केला आहे.
एलआयसी आयपीओ
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा बहुप्रतिक्षित आयपीओ पुढील महिन्यात सादर होणार आहे. सरकारची यातील किमान 5 टक्के हिस्सेदारी विकली जाणार आहे. यातून सरकारला 75 हजार कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. आयपीओ 11 मार्चला लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
ओयो आयपीओ
ओयो रूम्स आणि हॉटेल्स मार्चमध्ये त्यांचा आयपीओ लाँच करण्याची शक्यता आहे. हॉस्पिटॅलिटी उद्योगाशी संबंधित असलेल्या या कंपनीला 8,430 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. आयपीओ 7 हजार कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इश्यू आणि 1,430 कोटी रुपयांपर्यंतची विक्री ऑफर निर्धारीत करेल.
ओला आयपीओ
ओएलएक्स 2022च्या पहिल्या सहा महिन्यात बाजारात उतरण्याच्या विचारात आहे. आयपीओ साधारणत 15 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. कंपनीचा हा आयपीओ सॉफ्टबँक, टायगर ग्लोबल आणि स्टेडव्ह्यू कॅपिटल अशा अेनक गुंतवणूकदारांना त्यांचे शेअर्स विकण्यासाठी किंवा भागधारकांच्या निधीची भरपाई करण्यासाठी बाहेर पडण्यास मदत करेल.
डिलिव्हरी आयपीओ
ई- कॉमर्स लॉजिस्टिक फर्म डिलीव्हरी आपल्या आयपीओतून 7,460 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. कंपनी 2,460 कोटी रुपयांच्या ‘ऑफर फॉर सेल’सह 5 हजार कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स सादर करणार आहे.
बायजुस आयपीओ
ऑनलाइन शिक्षण देणारी तसेच एक उभरती स्टार्टअप कंपनी असलेली बायजुस लवकरच आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. कंपनी 4 ते 6 बिलियन डॉलरपर्यंत भागभांडवल उभारण्याची योजना आखत आहे.
एनएसई आयपीओ
भारतातील सर्वात मोठे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज 10 हजार कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. एसबीआय, एलआयसी, आयएफसीआय, आयडीबीआय बँक, गोल्डमन सॅक्स, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, टायगर ग्लोबल आणि सिटीग्रुप हे कंपनीचे प्रमुख भागधारक आहेत. यासह गो एअर लाईन इंडिया लि., वन मोबिक्विक सिस्टीम लि, क्वेंटोर अग्रो लि., स्नॅपडील लि., उत्कर्ष फायनान्स बँक यांचेही आयपीओ बाजारात येणार आहेत.