सप्टेंबर महिना आता संपला असून ऑक्टोबर सुरू होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात काही बदल होत असतात. ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेपासून काही मोठे बदल होणार आहेत. एलपीजीच्या किंमती, आधार कार्ड आणि लघु बचत योजना यांच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. हे नियम बदल्यामुळे याचा तुमच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घ्या 1 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारपासून काय बदल होणार आहेत?
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलत असतात. आता तुम्हाला 1 ऑक्टोबर 2024 च्या पहाटे सिलेंडरच्या किमतीत बदल दिसू शकतो. सुधारित किमती सकाळी 6 वाजता जाहीर केली जाते. गेल्या काही महिन्यात 19 किलोच्या कर्मशियल गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये अनेक बदल झाले आहेत. तर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बराच काळ बदल झालेला नाही. त्यामुळे आता उद्या बदल होणार की आहे तीच किंमत राहणार हे सकाळीच कळणार आहे.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, तेल कंपन्या हवाई इंधन – एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किमती देखील जाहीर करत असतात. अशा परिस्थितीत मंगळवारी सकाळी त्यांच्या नवीन सुधारित किमती लागू होतील. सप्टेंबर महिन्यात एटीएफच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या.
पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी किंवा आयकर रिटर्न भरण्यासाठी आधार नोंदणी आयडी वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. हा नवा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. पॅनचा गैरवापर आणि डुप्लिकेशन रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
१ ऑक्टोबरपासून कन्या योजना सुकन्या समृद्धी योजनेचे नियमही बदलणार आहेत. नवीन नियमानुसार, सुकन्या समृद्धी खाते आजी-आजोबांनी उघडले असेल, तर खाते पालक किंवा जैविक पालकांकडे हस्तांतरित केले जाईल. जर दोनपेक्षा जास्त खाती उघडली गेली असतील तर अतिरिक्त खाते बंद केले जाईल.
१ ऑक्टोबरपासून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफच्या नियमात देखील बदल होत आहेत. PPF मध्ये पहिला बदल हा अल्पवयीन मुलांसाठी उघडलेल्या खात्याशी संबंधित आहे. ज्यामध्ये अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेल्या PPF खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दराने तो १८ वर्षांचा होईपर्यंत व्याज मिळेल. त्यानंतर, पीपीएफसाठी लागू होणारा व्याजदर लागू होईल. 18 व्या वाढदिवसापासून मॅच्युरिटीची गणना केली जाईल.
दुसरा बदल असा आहे की जर एखाद्याने एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडले असेल, तर प्राथमिक खात्यावर सध्याचा व्याजदर लागू होईल आणि दुय्यम खाते प्राथमिक खात्यात विलीन केले जाईल. जास्तीची रक्कम 0% व्याजासह परत केली जाईल. दोन पेक्षा जास्त अतिरिक्त खाती उघडल्याच्या तारखेपासून 0% व्याज मिळतील.
तिसरा बदल अनिवासी भारतीयांबाबत आहे, म्हणजे, अशा सक्रिय अनिवासी भारतीय ज्यांची पीपीएफ खाती 1968 अंतर्गत उघडली गेली होती, जेथे फॉर्म एच ने खातेधारकाच्या निवासी स्थितीबद्दल विशेष विचारलेले नाही. अशा खातेदारांना पोस्ट ऑफिस बचत खाते (POSA) व्याज 30 सप्टेंबरपर्यंत मिळेल. या तारखेनंतर, व्याज 0% असेल.
१ ऑक्टोबरपासून एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या लॉयल्टी प्रोग्राममध्ये बदल होणार आहे. नवीन नियमानुसार, HDFC बँकेने SmartBuy प्लॅटफॉर्मवरील Apple उत्पादनांसाठी रिवॉर्ड पॉइंट्सची पूर्तता प्रति कॅलेंडर तिमाही एका उत्पादनापर्यंत मर्यादित केली आहे.