क्रिप्टो करन्सीच्या (cryptocurrency) शेवटाची सुरुवात झालीय का? तुम्ही विचाराल आम्ही हा प्रश्न का विचारत आहोत तुमचा प्रश्न योग्य आहे. पण सध्या घडत असलेल्या विविध घटनांमुळे क्रिप्टोचा तारा निखळण्याच्या स्थितीत दिसू लागला आहे. गेल्या वर्षात जगभरात क्रिप्टोकरन्सीच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरण झालीये. भारतात क्रिप्टोला सरकारनं (Government) अवैध घोषित केलेलं नाही. मात्र, नियम आणि कायदे एवढे कडक केलेत त्यामुळे कुणीही क्रिप्टोमध्ये गुंतवणूक (Investment) करण्यासाठी धजावत नाही. भारतातील परिस्थिती आपण नंतर पाहूयात, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिप्टोची स्थिती कशी आहे ते आधी पाहूयात. सुरूवातीला सगळ्यात प्रसिद्ध अशा बिटकॉईनची स्थिती पाहूयात. बिटकॉईनची किमत स्थिरस्थावर होत असतानाही गेल्या तीन महिन्यात बिटकॉईनच्या किंमती 15 टक्क्यांनी घटल्या आहेत. गुरुवारी बिटकॉईनची किमत 43,000 डॉलरपर्यंत होती. त्याच बीटकॉईनची किंमत तीन महिन्यांपूर्वी 51,987 पर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती.
क्रिप्टोचा रंग फिका पडण्याचे अनेक कारणे आहेत, जगातील सगळ्याच सरकारच्या निर्बंधाच्या कचाट्यात क्रिप्टो सापडली आहे. तरीही जगातील कोणत्याही सरकारला क्रिप्टोवर बंदी घालता आली नाही हेही तेवढेच खरे आहे. मात्र, दुसरीकडे सरकार क्रिप्टोची भरभराट देखील होऊ देत नाही हेही आता गुंतवणूकदारांना हळूहळू समजत आहे. रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे हाहाकार माजल्यानंतर क्रिप्टोची चमक थोडी परत आलीये. 24 फेब्रुवारी ते 24 मार्चदरम्यान बिटकॉईनच्या किंमतीत 23 टक्के वाढ झालीये. किंमतीत वाढ झाली असतानाही गेल्या वर्षीच्या 68-69,000 डॉलरच्या तुलनेत सध्याच्या किंमती खूपच कमी आहेत.
किंमती कमी होत असल्यामुळे क्रिप्टो गुंतवणुकीत गुंतवणूकदार फारसा उत्साह दाखवत नाहीत. गेल्या वर्षी मध्य अमेरिकेतील अल सल्वाडोर या देशानं क्रिप्टोच्या व्यवहाराला परवानगी दिलीये. त्यानंतर क्रिप्टोच्या बाजारात थोडासा उत्साह आला. मात्र,क्रिप्टोचा वापर करून सल्वाडोरमध्ये खूप मोठे व्यवहार न झाल्यानं ही आशासुद्धा मावळली आहे. आता पुन्हा क्रिप्टोची भारतातील स्थिती पाहूयात. गेल्या एक दोन वर्षांपासून भारतात क्रिप्टोवरून गदारोळ सुरू आहे. क्रिप्टो एक्सचेंजची संख्या देखील वाढली आहे. मोठ मोठे दावे करण्यात येत आहेत. एवढे कोटी गुंतवणूकदार, एवढ्या किंमतीची गुंतवणूक असे दावे करण्यात येतात. मात्र क्रिप्टोमुळे आरबीआय आणि सरकार चिंताग्रस्त आहे. त्यामुळे सरकारनं क्रिप्टोच्या रस्त्यात अडथळे उभारले आहेत. या अडथळ्यांमुळेच गुंतवणूकदार आणि क्रिप्टो एक्सचेंज अडचणीत आलेत. त्यामुळेच सरकारनं कर चोरीच्या मुद्यावरून क्रिप्टो एक्सजेंवर कारवाई करत दंड ठोठावला आहे. सरकारनं क्रिप्टोला जुगाराचा दर्जा दिलाय आणि 30 टक्के करसुद्धा लावलाय. आता सरकार वित्त विधेयकामध्ये क्रिप्टोसंदर्भात आणखी कडक कायदे करणार आहे. म्हणजेच एखाद्या नाण्यातील तोटा दुसऱ्या नाण्यात तुम्हाला दाखवता येणार नाही. या विधेयकांत दंडाचीही तरतूद आहे. सरकारची ही क्लुप्तीही कामाला येत आहे. त्यामुळे भारतात क्रिप्टोसाठी सध्या तरी वातावरण पोषक नसल्याचे दिसून येत आहे.
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार , सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला
IPO बाजारात इतना सन्नाटा क्यू है भाई ? तीन महिन्यांत केवळ 4 कंपन्यांची एंट्री