नवी दिल्ली : अमेरिकन संशोधन संस्था हिंडनबर्ग रिसर्चच्या ( Hindenburg Research) अहवालाने गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या साम्राज्याला तडे गेलेच. गेल्या दहा दिवसांपासून उठलेल्या वादळात अदानी समूहाची पडझड झाली. अजूनही समूह या धक्क्यातून सावरलेला नाही. अदानी समूहाच्या 10 शेअरमध्ये आपटी बार सुरु आहे. गेल्या सहा दिवसांत कंपनीच्या शेअरची घसरण झाल्याने 107 अब्ज डॉलरची म्हणजे जवळपास 8.76 लाख कोटींचे नुकसान झाले. या नुकसानीचा अंदाज बांधला तर काही देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाइतके (GDP) हे नुकसान आहे.
रुपया आणि डॉलरचा विनिमय दर (Exchange Rate) 81.80 नुसार इथिओपिया वा केनिया या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) 110-111 अब्ज डॉलर आहे. म्हणजे गेल्या 6 दिवसांत गौतम अदानी यांनी जवळपास इतकीच संपत्ती गमावली आहे, जेवढी केनिया आणि इथिओपिया यांचा जीडीपी आहे.
अदानी समूहाच्या अदानी टोटल गॅस या कंपनीला 29 दशलक्ष डॉलरचे नुकसान झाले. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, 24 जानेवारी रोजी गौतम अदानी वैयक्तिक संपत्तीत 119 अब्ज डॉलर होती. याच दिवशी हिंडनबर्गने संशोधक अहवाल सादर केला.
या अहवालानंतर अदानी यांचे साम्राज्य हादरले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एकूण संपत्ती 150 अब्ज डॉलर पेक्षा जास्त होती. सप्टेंबरपासून आतापर्यंत गौतम अदानी 86 अब्ज डॉलरपेक्षा अधिकची संपत्ती गमावली. गौतम अदानी यांनी आतापर्यंत बुल्गेरियाचा जीडीपी इतकी संपत्ती गमावली आहे.
ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, अदानी यांनी यावर्षी आतापर्यंत जवळपास 50 अब्ज डॉलरची एकूण संपत्ती गमावली. केवळ एका दिवशी त्यांची एकूण 15 अब्ज डॉलर संपत्ती घटली. त्यांची एकूण संपत्ती 64 अब्ज डॉलर पेक्षा कमी झाली.
या घडामोडींचा परिणाम त्यांच्या संपत्तीवर झाला आहे. आता जागतिक अब्जाधिशांच्या यादीत अदानी यांचे स्थान घसरुन ते 16 व्या क्रमांकावर आले आहेत. तर आशियातील श्रीमंतांच्या यादीतून ही त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेसने बाजारात 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ उतरविला होता. पण हा एफपीओ त्यांना रद्द करण्याची परिस्थिती ओढावली. तसेच आता त्यांना कर्ज देणाऱ्या बँकांकडे ही विचारणा होत आहे. एलआयसीवरही दबाव वाढला आहे.
अदानींनी या प्रकरणी स्वतः वक्तव्य करत, गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच समूहावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. परंतु, या आवाहनाचा कोणताही परिणाम गुंतवणूकदारांवर झालेला दिसत नाही. गेल्या पाच वर्षांत अदानी यांच्या शेअरमध्ये 800 टक्क्यांची तेजी आली होती. पण पाच दिवसांत शेअरमध्ये 40 टक्क्यांची घसरण झाली.