नरेंद्र मोदींमुळे गौतम अदानी यांची व्यावसायिक भरभराट?, राजीव गांधींसह चार पंतप्रधानांचं उदाहरण देत म्हणाले….
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचं नातं कसं आहे? याविषयी गौतम अदानी यांनी माहिती दिलीय...
मुंबई : अदानी ग्रुप (Adani Group) देशातील अग्रेसर औद्योगिक समुह… या औद्योगिक समुहाचं वार्षिक उत्पन्न मागच्या काही वर्षात इतकं वाढलं आहे की, गौतम अदानी जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.पण त्यांच्या प्रगतीचा आलेख पाहता त्यांच्यावर काही आरोपही होतात. अदानी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Gautam Adani and Narendra Modi Relation) जवळचे असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो. याविषयी विचारलं असता त्यांनी चार पंतप्रधानांच्या कार्यकाळाचा दाखला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी एकाच राज्यातून येतो. त्यामुळे आमच्या सलगीचे आरोप लावण्यात येतात.पण त्यात तथ्य नाही, असं अदानी म्हणालेत. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
मी माझा औद्योगिक प्रवास चार भागात सांगू इच्छितो. माझा औद्योगिक प्रवास राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरू झाला. तेव्हा एक्झिम पॉलिसीचा विस्तार करायला सुरूवात केली. अनेक गोष्टी पहिल्यांदाच OGL लिस्टमध्ये आल्या.यातून माध्या व्यावसायाला गती मिळाली. जर राजीव गांधी पंरप्रधान नसते तर माझ्या व्यावसायिक प्रवासाची एवढी दमदार सुरुवात झाली नसती, असं अदानी म्हणालेत.
मला दुसरी संधी 1991 मध्ये मिळाली. जेव्हा नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणा सुरू केल्या. त्यांच्या या नव्या आर्थिक धोरणामुळे माझ्यासह अनेकांना फायदा झाला. याबद्दल मी बऱ्याचदा बोललो आहे. या नव्या आर्थिक धोरणामुळे माझ्या व्यावसायाला गती मिळाली.
केशुभाई पटेल 1995 गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा पुन्हा एकदा औद्योगिक भरारी घेतली. 1995 पर्यंत फक्त मुंबई ते दिल्ली हायवे विकसित झाला होता. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि धोरणांतील बदलामुळे मला मुंद्रा बंदर बांधण्याची संधी मिळाली, तो या सगळ्या प्रवासातील मैलाचा दगड होता, असं अदानी म्हणाले.
2001 मध्ये जेव्हा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये नवे काही प्रकल्प आणले. तेव्हा त्यांच्या धोरणांमुळे गुजरातमध्ये व्यावसायांना चालना मिळाली. त्यातून उद्योग आणि रोजगाराचा विकास झाला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत.ते देशाचे प्रमुख आहेत. आमची एक अग्रेसर उद्योग समुह आहे. मोदी आणि माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. पण त्याचा माझ्या औद्योगिक प्रगतीशी तसा थेट संबंध नाही, असं अदानी म्हणाले.