Ambani-Adani : खेळ कुणाला दैवाचा कळला! श्रीमंतांच्या यादीत अदानी आता अंबानी यांच्यापेक्षा अजून पिछाडीवर
Ambani-Adani : हिंडनबर्ग अहवालाच्या भूंकपामुळे अदानी समूह अद्यापही सावरलेला नाही. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता 44.5 अब्ज डॉलर इतकी राहिली आहे. फोर्ब्स रिअल टाईम बिलेनिअर इंडेक्समध्ये अदानी आता दूर फेकले गेले आहेत.
नवी दिल्ली : अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गच्या अहवालाने (Hindenburg Report) अख्खा अदानी समूह हादरला. या समूहातील कंपन्यांचे शेअर पत्तासारखे कोसळले. त्यात पडझड थांबलेली नाही. गेल्या महिन्यात 24 जानेवारी रोजी हिंडनबर्ग रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला. त्याचा असा काही फटका बसला की, अदानी समूहाला एफपीओ (FPO) मागे घेण्याची नामुष्की ओढावली. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या एकूण संपत्तीतही मोठी घसरण झाली. आज सकाळी 10 वाजता अदानी यांच्या एकूण संपत्ती 5 अब्ज डॉलरचा सुरुंग लागला. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर इंडेक्समध्ये अदानी आता 26 व्या क्रमांकावर फेकले गेले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे टॉप-10 मध्ये 8 व्या स्थानी आहेत.
अदानींच्या अडचणी अजूनही कमी झालेल्या नाहीत. त्यांच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त पडझड सुरु आहे. आता बाजार नियामक सेबी ही कारवाईसाठी पुढे येत आहे. सेबीने रेटिंग फर्मकडून अदानी समूहाच्या कंपन्यांद्वारे घेतलेले कर्ज आणि सुरक्षित रक्कमेवर देण्यात आलेल्या रेटिंगबाबतची सविस्तर माहिती मागितली आहे.
या बातमीनंतर गेल्या काही दिवसांपासून अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स आणि अदानी विल्मर यामध्ये परतणारी चमकही फिक्की झाली. गुंतवणूकदार धडाधड अदानी समूहाच्या शेअरची विक्री करत आहेत. बुधवारी, अदानी समूहाचे सर्व स्टॉक्सनी लाल निशाण फडकावले. अदानी समूहाची सर्वच शेअर जमिनीवर आले आहेत.
अदानींची प्रमुख कंपनी अदानी इंटरप्राईजेस 7 टक्क्यांपेक्षा अधिक घसरला. अदानी पॉवर सकाळी चार टक्क्यांनी वधारला आणि पुन्हा गडगडला. अदानी गॅस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन, एसीसी, एनडीटीव्ही आणि अंबुजा सिमेंट या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. गुंतवणूकदार या शेअरची विक्री करत आहेत.
शेअरमधील मोठ्या घसरणीमुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 44.5 अब्ज डॉलर इतकीच राहिली आहे. फोर्ब्स रिअल टाईम बिलेनिअर इंडेक्समध्ये अदानी आता मुकेश अंबानी यांच्यापेक्षा पिछाडीवर आहेत. अदानी अंबानी यांच्यापेक्षा 18 क्रमाक मागे फेकले गेले. तर मुकेश अंबानी हे श्रीमंतांच्या यादीत हे टॉप-10 मध्ये 8 व्या स्थानी आहेत.
मुकेश अंबानी यांनी ही संपत्ती गमावली आहे. अंबानी यांनी आज 1.4 अब्ज डॉलर संपत्ती गमावली आहे. तरीही श्रीमंतांच्या यादीत टॉप-10 मध्ये त्यांचे स्थान कायम आहे. 84.4 अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह ते टॉप-10 मध्ये 8 व्या स्थानी आहेत. या यादीत 212.2 अब्ज डॉलरसह बर्नार्ड अर्नोल्ट पहिल्या स्थानी आहेत.