बांगलादेशातील घडामोडींचा गौतम अदानी यांना बसू शकतो मोठा फटका; 8,39,393 लाख रुपये बुडण्याची भीती
Bangladesh Crisis Gautam Adani : बांगलादेशमध्ये सत्तापालट झाल्याने भारतीय वीज निर्मिती कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अदानी पॉवरला त्यामुळे 1 अब्ज डॉलरचा फटका बसू शकतो. तर इतरही वीज निर्मिती कंपन्यांचा पण जीव टांगणीला लागला आहे.
बांग्लादेशात सत्तापालट झाले. त्याचा मोठा फटका भारतातील अनेक कंपन्यांना बसला. सर्वाधिक फटका वीज निर्मिती आणि वितरण कंपन्यांना बसला आहे. भारताच्या जवळपास 5 विद्युत निर्मिती कंपन्यांना यामध्ये 1 अब्ज डॉलर म्हणजे 8,39,393 लाखांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये अदानी पॉवरचेच बांगलादेश सरकारकडे 80 कोटी डॉलर थकले आहेत. झारखंड येथील गोड्डा येथे अदानी पॉवर 1.6 गीगावॅट वीज निर्मिती करते. कोळशावर आधारीत वीज निर्मिती करण्यात येते. याठिकाणाहून बांगलादेशाला वीज पुरवठा करण्यात येत होता. या अंतर्गत एसईआयएल एनर्जी इंडियाचे शेजारील देशाकडे 150 दशलक्ष डॉलर थकीत हे. बांगलादेशाने 250 मेगावॅट वीज खरेदीचा करार केलेला आहे.
या कंपन्यांचे टेन्शन वाढले
सरकारी वीज निर्मिती कंपनी NTPC चे तीन संयंत्र बांगलादेशाला जवळपास 740 मेगावॅट वीजेचा पुरवठा करतात. या कंपनीचे शेजारील देशाकडे 80 दशलक्ष डॉलर थकीत आहेत. मार्चच्या शेवटी पीटीसी इंडियाचे जवळपास 84.5 दशलक्ष डॉलर थकीत आहेत. कंपनीला या 25 ऑगस्टपर्यंत 46 दशलक्ष डॉलर मिळाले आहेत. पीटीसी बांगलादेश विद्युत विकास बोर्डाला 250 मेगावॅट वीज पुरवठा करते. कंपनी 2013 पासून बांगलादेशाला वीज पुरवठा करत आहे.
या कंपन्यांची पण थकबाकी
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे शेजारील देशाकडून 20 दशलक्ष डॉलर येणे बाकी आहे. एनटीपीसी, एसईआयएल एनर्जी आणि पॉवर ग्रिडने किती रुपये जमा झाले याची माहिती ईटीने विचारलेल्या प्रश्नात दिली नाही. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे काही कंपन्यांना अद्याप कोळसा खरेदी आणि इतर थकबाकीसंदर्भात अडचण आहे. मोठी रक्कम थकीत असली तरी या कंपन्यांनी वीज पुरवठा अखंडित ठेवला आहे. त्यांनी विद्युत पुरवठा थांबवलेला नाही. पण अजून जास्त काळ या कंपन्या थकबाकीसाठी वाट पाहू शकत नाहीत. या कंपन्यांचे गुंतवणूकदार पण धास्तावण्याची शक्यता आहे.
नाहीतर वीज पुरवठ्यावर परिणाम
बांगलादेश सरकारने कंपन्यांची थकबाकी लागलीच दिली नाही तर यापुढे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वितरक आणि इतर अनेकांना या कंपन्यांना पण थकबाकी द्यायची आहे. या कंपन्यांना पैसा मिळाला तरच ते इतरांना पैसे देऊ शकतील. त्यामुळे या कंपन्या सध्याच्या सरकारवर थकीत रक्कम देण्यासाठी दबाव आणण्याची शक्यता आहे.