नवी दिल्ली : अदानी समूहाने (Adani Group) त्यांची फ्लॅगशिप कंपनी अदानी इंटरप्राईजेसबाबत (Adani Enterprises) मोठा निर्णय घेतला. या निर्णयाने शेअर बाजाराला हादरा बसला. हा निर्णय गुंतवणूकदारांच्या पथ्यावरच पडला. पण यामुळे अदानी समूहाच्या शेअरविषयी चर्चा सुरु झाली. अदानी इंटरप्राईजेसचा 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ (Follow on Public Offer) रद्द करण्यात आला. कंपनीने गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन संशोधन संस्था हिंडनबर्गच्या एका अहवालामुळे अदानी समूहाला मोठा झटका बसला. अदानी समूहाच्या कंपन्यांना आतापर्यंत 68 अब्ज डॉलरहून अधिकचा फटका बसला आहे. अदानी समूहाची नाक असलेली सर्वात मोठी कंपनी अदानी इंटरप्राईजेसचेच 25% अधिक नुकसान झाले आहे.
हिंडनबर्गच्या अहवालानंतर, ज्याप्रकारे अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर धडपडत आहेत, त्यावरुन अदानी यांना मोठा फटका बसल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचलेल्या अदानी यांना आता श्रीमंतांच्या टॉप-10 तर नाहीच पण त्यापुढेच्या क्रमवारीतही स्थान मिळाले नाही.
ब्लूमबर्ग बिलेनियरर्स इंडेक्सने (Bloomberg Billionaires Index) 2 फेब्रुवारी रोजी रिपोर्ट जाहीर केला. त्यानुसार, गौतम अदानी आता जगातील श्रीमंतांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांची एकूण संपत्ती 72.1 अब्ज डॉलर इतकी आहे. या इंडेक्सनुसार, अदानी यांना या रिपोर्टनंतर आतापर्यंत एकूण 48.5 अब्ज डॉलर गमवावे लागले. एकाच आठवड्यात अदानी यांना 12.5 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.
पण याचा अर्थ केवळ गौतम अदानी यांनाच फटका बसला, त्यांची संपत्ती कमी झाली असा नाही. तर या यादीत इतर भारतीय उद्योजकांचाही समावेश आहे. अर्थात त्यांची संपत्ती कमी होण्याची कारणे वेगळी आहेत. पण जानेवारी महिन्यात त्यांना फटका बसला हे नक्की.
या वर्षाची 2023 ची सुरुवात भारतीय उद्योजकांसाठी वाईट राहिली. या यादीत मुकेश अंबानी (Mukesh Ambani), राधा किशन दमानी (Radhakishan Damani) आणि सावित्री जिंदल (Savitri Jindal) यांचा समावेश आहे. या सर्व दिग्गज उद्योजकांची संपत्ती या जानेवारी महिन्यात कमी झाली आहे. त्यामागे अदानी यांच्यासारखे कारण नसले तरी संपत्ती घटली आहे.
Businessinsider च्या एका अहवालानुसार, मुकेश अंबानी यांचे आतापर्यंत 5 अब्ज डॉलर, राधा किशन दमानी यांचे 2 अब्ज डॉलर आणि सावित्री जिंदल यांचे 1 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. अदानी यांच्यासह या चार उद्योजकांना आतापर्यंत 56.5 अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. 2 फेब्रुवारी रोजी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मुल्यात एकूण 4,643,271,700,000 एवढ्या रुपयाचा फटका बसला आहे.
मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन आहेत. सावित्री जिंदल या जिंदल ग्रुपच्या (Jindal Group) प्रमुख आहेत. पती ओमप्रकाश जिंदल यांच्या मृत्यूनंतर या समूहाची सूत्रं त्यांच्या हाती आली आहेत. तर सुपर चेन मार्केट डी-मार्ट (D-Mart) राधा किशन दमानी यांचा उद्योग समूह आहे.
मुकेश अंबानी यांची या वर्षी 5 अब्ज डॉलर संपत्ती कमी झाली असली तरी श्रीमंतांच्या यादीत त्यांनी गौतम अदानी यांना पिछाडीवर टाकले आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 81 अब्ज डॉलर आहे.