सोन्याची ग्राहकांवर जबरदस्त मोहिणी; खरेदी केली सोन्यावाणी, महागाईची चिंता कोण करी
Gold Demand : भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत असल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर दिसून आला. World Gold Council च्या अहवालानुसार, चीननंतर भारतात जानेवारी-मार्च या तिमाहीत सोन्याची मागणी वाढली. या तीन महिन्यातील आकडेवारी डोळे फिरवणारी आहे.
सोन्याच्या किंमती अजून ही तेजीत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात सोन्याने महागाईचा टॉप गिअर टाकला आहे. पण सोन्याच्या मागणीवर त्याचा काही परिणाम दिसून आलेला नाही. World Gold Council च्या अहवालाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सोन्याच्या किंमतींनी ऐतिहासिक कामगिरी बजावलेली असतानाही आर्थिक ताकद वाढल्याने जानेवारी ते मार्च या तिमाहीत वार्षिक आधारावर सोन्याची मागणी 8 टक्क्यांनी वाढली. या दरम्यान सोन्याची मागणी 136.6 टन झाली आहे. या अहवालानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने सोन्याची खरेदी केली आहे. भारतात सोन्याची मागणी वाढण्यामागे हे पण एक कारण आहे. या तीन महिन्यात भारतात जवळपास 75,470 कोटींचे सोने खरेदी करण्यात आले. ही विक्री जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान झाली.
अशी वाढली मागणी
- यावर्षी जानेवारी ते मार्च या दरम्यान भारताची सोन्याची मागणी वार्षिक आधारावर 20 टक्क्यांनी वाढली आहे. तर किंमतीत साधारणपणे 11 टक्क्यांची तेजी आली आहे. ‘गोल्ड डिमांड ट्रेंड्स क्यू1 2024′ नुसार भारतात एकूण सोन्याची मागणी यामध्ये सोन्याचे दागदागिने आणि गुंतवणुकीचा समावेश आहे, वाढली आहे.
- गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत सोन्याची मागणी 126.3 टन होती. तर यंदा हा आकडा 136.6 टनावर पोहचला. भारतात सोन्याच्या मागणीत दागिन्यांची मागणी 4 टक्क्यांनी वाढली. ती आता 95.5 टन इतकी झाली आहे. गुंतवणुकीत, शिक्क्यांचे प्रमाण अधिक आहे. ही मागणी 19 टक्के वाढली. ती आता 41.1 टन झाली आहे.
का वाढली मागणी
बाजारातील तज्ज्ञानुसार भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, भारतात यंदा सोन्याची मागणी 700-800 टन होऊ शकते. जर किंमतीत तेजी कायम राहिली तर मागणीवर परिणाम होऊ शकतो. यापूर्वी 2023 मध्ये देशात सोन्याची मागणी 747.5 टन होती. तज्ज्ञांच्या मते, ज्यावेळी किंमती घसरतात, त्यावेळी भारत आणि चीनसह जगातील पूर्वोत्तर देशातील बाजारपेठेत बदल दिसतो. तर पश्चिमी देशात किंमती वधारल्या तर बाजारात बदल दिसतो. सध्या देशात सोने वधारले आहे.