Gold: अबब! कोरोनाच्या संकटकाळातही भारतात इतक्या टन सोन्याची आयात
मार्च महिन्याच्या आकडेवारीनुसार भारतात 160 टन सोन्याची आयात झाली आहे. | Gold import increase in India
मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक अरिष्ट ओढावण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून साधारण अशीच परिस्थिती असल्यामुळे बाजारपेठेतील मागणी घटली आहे. मात्र, सोनं (Gold rates) या सगळ्याला अपवाद ठरताना दिसत आहे. कारण, कोरोना संकटाच्या काळातही भारतात सोन्याची विक्रमी आयात होताना दिसत आहे. (Gold import in India increases amid coronavirus threat)
जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिलच्या (GJEPC) माहितीनुसार, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क घटवल्यामुळे पिवळ्या धातूची मागणी आणखीनच वाढली आहे. सध्याच्या घडीला सोन्यावरील आयातशुल्क 7.5 टक्के इतके आहे. मार्च महिन्याच्या आकडेवारीनुसार भारतात 160 टन सोन्याची आयात झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात मार्च महिन्यात देशात केवळ 28.29 टन इतकेच सोने आयात करण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे गेल्या वर्षभरात सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे.
भांडवली बाजार आणि गुंतवणुकीच्या इतर साधनांमध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदार सोन्यात जास्तीत जास्त पैसे गुंतवताना दिसत आहेत. मध्यंतरी लॉकडाऊनचे निर्बंध हटल्यानंतर लग्नसराईचा मोसम पुन्हा सुरु झाला होता. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढली होती. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे सोन्याची आभुषणे आणि रत्नांची मागणी पुन्हा वाढली होती.
सोन्याची आयात वाढण्याची कारणं
जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिलच्या अंदाजानुसार, मध्यंतरीच्या काळात लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाले तेव्हा विविध देशांतील उत्सव, सण तसेच खाणका आणि निर्यात पुन्हा सुरु झाल्यामुळे सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. तसेच लसीकरणामुळे कोरोनाच्या साथीवर मात करण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम सोन्याच्या मागणीवर दिसून येत आहे.
भारतात गेल्यावर्षीच्या तुलनेत सोन्याच्या आयातीत वाढ
गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याची आयात 22.58 टक्क्यांनी वाढून 34.6 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. सोन्याच्या आयातीमुळे चालू खात्यातील तूट वाढते. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार देशांतर्गत सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने आयातीचे प्रमाण वाढले आहे.
सोन्याच्या दागिन्यांचे नवीन नियम 1 जूनपासून लागू
आता देशात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्किंग करणे आवश्यक आहे. हा नियम 1 जून 2021 पासून संपूर्ण देशात लागू होईल. केंद्र सरकारने जानेवारी 2020 मध्ये म्हटले होते की सोन्याच्या दागिन्यांवरील अनिवार्य हॉलमार्किंग 15 जानेवारी 2021 पासून अंमलात येईल, परंतु कोरोना महामारीमुळे सरकारने याची तारीख 1 जून 2021 पर्यंत वाढविली. गोल्ड हॉलमार्किंग शुद्धतेचा पुरावा मानली जाते आणि सध्या हे ऐच्छिक आहे.
संबंधित बातम्या:
नावात ऑक्सिजन असल्याचा असाही फायदा, कंपनीचे दोन महिन्यात शेअर्सचे भाव दुप्पट, नेमकं प्रकरण काय?
Gold Price: दागिन्यांच्या दुकानात सोन्याचे भाव वेगळे का असतात?, जाणून घ्या ‘कारण’
कोरोना काळातही सोन्याची जोरदार खरेदी, गेल्या आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीमध्ये 22.58% वाढ
(Gold import in India increases amid coronavirus threat)