Gold Mines : सापडले घबाड! KGF पेक्षा जास्त सोनं निघणार, ही राज्य मालामाल होणार
Gold Mines : देशातील या पाच राज्यांत सोन्याचे घबाड सापडले आहे. येथे सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. त्यामुळे ही राज्य तर श्रीमंत होणारच आहे. पण देशाला पण त्याचा मोठा फायदा होणार आहे. देशातील सोन्याची आयात कमी होऊ शकते.
नवी दिल्ली : देशातील या पाच राज्यांत सोन्याचे घबाड सापडले आहे. येथे सोन्याच्या खाणी (Gold Mines) सापडल्या आहेत. त्यामुळे ही राज्य तर श्रीमंत होणारच आहे. पण देशाला पण त्याचा मोठा फायदा होणार आहे. देशातील सोन्याची आयात कमी होऊ शकते. केंद्र सरकारने लोकसभेत (Loksabha) याविषयीची माहिती दिली. सोन्याचे भंडार सापडल्याने सोन्याच्या भावातही फरक येऊ शकतो. या खाणीतून मोठ्या प्रमाणावर सोने गवसल्यास भारताला मोठा फायदा होईल. भारतात काही महिन्यांपूर्वी एक्सचेंज बुलियन (Exchange Bullion) सुरु झाले आहे. त्यामुळे देशभर सोन्याचा एकच भाव असेल. त्यात देशात सोने सापडल्याने आयातीवरचा भर कमी होईल.
या राज्यात सापडला खजिना
केंद्र सरकारने लोकसभेत याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, झारखंड या पाच राज्यात हे घबाड सापडले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत, मॅपिंग केल्यानंतर सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. अजूनही काही ठिकाणी शोध मोहिम राबविण्यात येत आहे. त्यात जर यश मिळाले तर भविष्यातील चित्र वेगळे असू शकते.
देशातील 7 राज्यात खजिना
आंध्रप्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ आणि राजस्थानमध्ये यापूर्वी पण सोने सापडले आहे. याठिकाणी शोध मोहिम सुरुच आहेत. देशात एकूण सात राज्यात सोने सातत्याने सापडत आले आहे. आता आणखी 18 ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत.
आंध्र प्रदेश नव्हे सोने प्रदेश
आंध्र प्रदेशात सर्वाधिक सोन्याचा खजिना सापडला आहे. रामगिरी नॉर्थ ब्लॉक, बोक्समल्ली नॉर्थ ब्लॉक, बोक्समपल्ली साउथ ब्लॉक, जवाकुला-ए ब्लॉक, जवाकुला-बी ब्लॉक, जवाकुला-सी ब्लॉक, जवाकुला-डी ब्लॉक, जवाकुला-ई ब्लॉक, जवाकुला-एफ ब्लॉक याठिकाणी सोने सापडले आहे. उत्तर प्रदेशातील तीन पैकी दोन सोन्याच्या खाणी सोनभद्र येथे आहेत. या तीन खाणीसाठी गेल्यावर्षी 21 मे रोजी निविदा काढण्यात आली होती.
सध्या भारतात सोन्याच्या तीन ठिकाणी खाणी आहेत. यापैकी कर्नाटकातील हुट्टी आणि उटी येथे सोन्याच्या खाणी आहेत. तर झारखंडमध्ये हिराबुद्दीन परिसरात सोन्याची खाण आहे. भारताचे सोन्याचे उत्पादन जवळपास 1.6 टन आहे. तर वार्षिक वापर 774 टन इतका आहे. उत्पादनाच्या अनेक पट्टीत आयात होते आणि वापर होतो.
देशात सोन्याची मागणी सातत्याने वाढत असल्याने केंद्र सरकार देशातच सोन्याचे उत्पादन वाढविण्यावर भर देत आहे. त्यासाठी गेल्यावर्षी निती आयोगाने पावले टाकली आहेत. त्यासाठी देशात अनेक ठिकाणी सर्व्हेक्षण करण्यात आले. खनिज मंत्रालयाने याविषयीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार, भारताचे एकूण सोने भांडार 70.1 टन (4.1 जी/टन वर 17.2 एमटी) आहे. देशात सर्वाधिक सोने दक्षिण भारतात आहे. कर्नाटक राज्यातच 88 टक्के सोने साठा आहे.
सोन्याचे या ठिकाणी भंडार
- महाराष्ट्रातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याचे भंडार सापडले आहे.
- तर मध्य प्रदेशातील सीधी आणि कटनी जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत.
- झारखंडमधील सिंहभूम आणि रांची जिल्ह्यात सोन्याचा खजिना गवसला आहे.
- कर्नाटकमधील तुमकुर, धारवाड, हवेरी, दावनगेरे, चित्रदुर्ग, रायचूरमध्ये सोने सापडले
- राजस्थानमधील बांसवाडा आणि अलवर मध्ये सोन्याच्या खाणी मिळाल्या आहेत.