Gold Return | गुंतवणूक ठरली ‘सोन्या’वाणी, एका वर्षात सोन्याने दिला इतका परतावा
Gold Return | सोन्यातील गुंतवणूक कधी ही फायदेशीर ठरते. मोदी सरकारच्या दुसरा टप्पा पण संपत आला आहे. या दहा वर्षांत सोने-चांदीच्या भावाने भूतो न भविष्यती अशी झेप घेतली आहे. यापूर्वी सोन्याच्या किंमतीत इतकी मोठी भरारी एकदम दिसली नाही. गेल्या दिवाळीत ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली, त्यांना मोठा परतावा मिळाला..
नवी दिल्ली | 24 ऑक्टोबर 2023 : सणासुदीच्या काळात सोने खरेदीची परंपरा आहे. भारतीय खरेदीदार सणासुदीत सोने-चांदीत गुंतवणूक करतात. सोने दागदागिने अथवा तुकडा खरेदीला प्राधान्य देतात. सणावारात सोन्याची मागणी अधिक असते. त्यात दसरा आणि दिवाळीच्या काळात तर सराफा बाजार ओसंडून वाहतो. ग्राहकांची रेलचेल असते. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानण्यात येते. तर परताव्यात सोन्याने आतापर्यंत कच खाल्ली नाही. त्यामुळे परंपरागत आणि तरुणांची पहिली पसंती सोन्यातील गुंतवणुकीला असते. देशात गेल्या काही वर्षांत सोन्याने मोठी झेप घेतली आहे. तसा जोरदार परतावा पण दिला आहे. खरेदीदारांना या एका वर्षात इतक्या टक्क्याचा रिटर्न सोने खरेदीमुळे मिळाला आहे.
सोन्याचा घसघशीत परतावा
सोन्याने गेल्या दिवाळीपासून 20 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत 10 ग्रॅम सोने 10,000 रुपयांनी वधारले. सराफा बाजारात या काळात सोन्याचा भाव 60,700 रुपयांच्याही पुढचा टप्पा गाठून आला. बाजारातील तज्ज्ञानुसार, सोन्याच्या किंमती येत्या काही काळात असाच जोरदार परतावा देतील. इस्त्राईल-हमास युद्धाची व्याप्ती वाढल्यास सोने-चांदीचे भाव गगनाला भिडतील.
असा वधारला भाव
मंगळवारी, सोन्याची किंमतीत वाढ झाली. सोन्याने गेल्या शुक्रवारी, 20 ऑक्टोबर रोजी पाच महिन्यातील उच्चांक गाठला. तर दोन आठवड्यात किंमतीत 9 टक्के वाढ झाली. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे सोन्याच्या किंमतीत उसळी येण्याची दाट शक्यता आहे. जागतिक बाजारात सोने 0.2 टक्क्यांनी वाढले. सोने 1,976.99 प्रति औंसवर पोहचले. तर अमेरिकन बाजारात सोने स्थिर आहे. तर सोमवारी वायदे बाजारात सोन्यात घसरण झाली. दहा ग्रॅम सोन्याचा भाव 60,598 रुपयांवर आला. तर चांदीत 1.18% टक्क्यांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव 72,052 रुपये होता.
अशी घेईल सोने उसळी
सोन्याच्या किंमती 62,000 – 62,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होतील आणि एक किलो चांदी 75,000 रुपयांवर पोहचेल असा अंदाज तज्ज्ञ वर्तवित आहेत. दिवाळीपर्यंत म्हणजे पुढच्या वर्षी ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. तर डिसेंबर 2023 मध्ये वायदे बाजारात 10 ग्रॅम सोने 64,000 चा टप्पा गाठेल तर एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपयांवर पोहचेल.
विशेष सूचना : सोने आणि चांदीत गुंतवणूक करताना बाजाराचा अंदाज आणि अभ्यास केल्याशिवाय करु नका. तुम्ही तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला पण घेऊ शकतात. या लेखातील अंदाज हे तज्ज्ञांचे वैयक्तिक मत आहे. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.