नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : अमेरिकन डॉलर सध्या मजबूत स्थितीत पोहचला आहे. सोने-चांदी त्यामुळे दबावाखाली आहे. आतापर्यंत ग्राहकांना खुशखबर देणाऱ्या मौल्यवान धातूंनी शनिवारपासून आगेकूच केली आहे. किंमतींनी एकाच आठवड्यात मोठा पल्ला गाठला आहे. इस्त्राईल-हमास युद्धाने मौल्यवान धातूने मोठी झेप घेतली आहे. देशात पितृपक्षाने सराफा बाजारात म्हणावी तशी गर्दी नाही. पण हा पंधरवाडा संपताच सोने-चांदीचे वाढलेले भाव ग्राहकांच्या जीवाला घोर लावणार हे नक्की. 6 ऑक्टोबरनंतर सोने-चांदीने (Gold Silver Rate Today 13 October 2023) मागे वळून पाहिलचे नाही. दोन्ही धातूंनी उसळी घेतली आहे.
सोन्याची चढाई
गुडरिटर्न्सनुसार, सोन्याने या आठवड्यात मोठा पल्ला गाठला. सोन्याने या आठवड्यात जोरदार झेप घेतली. 12 ऑक्टोबर रोजी किंमती 350 रुपयांनी वधारल्या. त्यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी किंमतीत 330 रुपयांची वाढ झाली होती. 9 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. तर 8 ऑक्टोबरला 440 रुपयांची उसळी घेतली होती. गेल्या शनिवारी 310 रुपयांनी किंमती वाढल्या होत्या. 1600 रुपयांपेक्षा अधिकची झेप सोन्याने घेतली आहे. 22 कॅरेट सोने 54,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,060 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
चांदीची उसळी
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला चांदीत मोठी घसरण झाली. पण युद्धाने सर्व समीकरणं बदलवले. 7 ऑक्टोबर रोजी चांदीने 1500 रुपयांची आघाडी घेतली. तर 9 ऑक्टोबर रोजी किंमती 500 रुपयांनी वधारल्या. 11 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. 12 ऑक्टोबर रोजी किंमती 500 रुपयांनी वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 72,600 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट असा आहे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 58,144 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 57,911 रुपये, 22 कॅरेट सोने 53,260 रुपये, 18 कॅरेट 43,608 रुपये, 14 कॅरेट सोने 33,014 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,699 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.