Gold Silver Rate Today 18 May 2024 : मोठ्या उसळीनंतर सोने-चांदीत मामुली घसरण, सराफा बाजारात असा आहे भाव
Gold Silver Rate Today 18 May 2024 : गेल्या दोन दिवसांत सोने आणि चांदीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. या हनुमान उडीनंतर भावात किंचित घसरण झाली आहे. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात मौल्यवान धातूमध्ये घसरण झाली आहे.
आठवड्याच्या शेवटच्या सत्रात ग्राहकांना दिलासा मिळाला. दोन दिवसांच्या सोने-चांदीच्या भरारीनंतर किंमतीत नरमाई आली. विकेंड खरेदीचा आनंद द्विगुणीत झाला. अक्षय तृतीयेला मौल्यवान धातूंनी जोरदार आगेकूच केली होती. या आठवड्यात सलग दोन दिवस बेशकिंमती धातूंनी तुफान फटकेबाजी केली. दोन दिवसांत सोने 1100 रुपयांनी वधारले तर चांदीत 2600 रुपयांची वाढ झाली. घसरणीनंतर अशी आहे सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 18 May 2024 )
दरवाढीला सोन्याचा ब्रेक
या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूत घसरण होती. 13 आणि 14 मे रोजी किंमती अनुक्रमे 100 आणि 400 रुपयांनी उतरल्या. 15 मे आणि 16 मे रोजी त्यात 400 आणि 770 रुपयांची दरवाढ दिसली. 17 मे रोजी किंमतीत 270 रुपयांची घसरण आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुसंडीनंतर चांदी नरमली
17 एप्रिलपासून चांदीच्या किंमतीत नरमाई होती. अक्षय तृतीयेला त्यात मोठी वाढ झाली. या आठवड्यात 13 मे रोजी चांदी 500 रुपयांनी उतरली तर 14 मे रोजी 700 रुपयांनी वधारली. 15 आणि 16 मे रोजी अनुक्रमे 400 आणि 1500 रुपयांनी किंमती वधारल्या. तीन दिवसांत चांदी 2600 रुपयांनी महागली. शुक्रवारी किंमती जैसे थे होत्या. आज सकाळच्या सत्रात चांदी घसरणीचे संकेत देत आहे. दुपारनंतर भावाची दिशा स्पष्ट होईल. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,100 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 73,383 रुपये, 23 कॅरेट 73,089 रुपये, 22 कॅरेट सोने 67,219 रुपये झाले. 18 कॅरेट 55,037 रुपये, 14 कॅरेट सोने 42,929 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 86,373 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
गेल्या पाच वर्षांत असा दिला रिटर्न
गेल्या पाच वर्षांत सोन्याने ग्राहकांना, गुंतवणूकदारांना 18% वार्षिक परतावा दिला आहे. तर याच दरम्यान निफ्टीने वार्षिक जवळपास 15 टक्क्यांची झेप घेतली आहे. अर्थात 1, 3, 10 आणि 15 वर्षांच्या आकडेवारी नजर टाकली तर निफ्टीने सोन्याला पिछाडीवर टाकल्याचे दिसून येते. गेल्या सात वर्षांत दोघांचा रिटर्न सारखाच होता. या दरम्यान निफ्टीने 15% सीएजीआर रिटर्न तर सोन्याने 14 टक्के वाढ नोंदवली.