Gold Silver Rate Today 19 May 2024 : चांदीची हनुमान उडी, सोने पण चमकले, आठवड्याच्या शेवटी भाव भराभर वाढले
Gold Silver Rate Today 19 May 2024 : या आठवड्यात चांदीने मोठी झेप घेतली. सोन्याचा भाव मार्च आणि एप्रिल महिन्यातील विक्रमी दरवाढीने अगोदरच गगनाला भिडला आहे. या आठवड्याच्या शेवटी मौल्यवान धातूच्या किंमती अशा वधारल्या.
मार्च आणि एप्रिलच्या रेकॉर्डब्रेक दरवाढीने सोने-चांदी गगनाला भिडले. चांदीने 17 एप्रिलपासून मोठी झेप घेतली नसली तरी अधून-मधून फटकेबाजी केली होती. त्यामुळे चांदीचा भाव आता 86 हजारांचा टप्पा ओलांडून 87 हजारांकडे कूच करत आहे. गुडरिटर्न्सनुसार, चांदी 95 हजारांकडे कूच करत आहे. तर दुसरीकडे आठवड्याच्या अखेरच्या टप्प्यात सोन्याने दमदार चढाई केली. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला. आता सोने आणि चांदीच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 19 May 2024 )
सोन्याची जोरदार मुसंडी
या आठवड्यात सोने सुरुवातीला नरमले. सुरुवातीच्या दोन दिवसांत 13 आणि 14 मे रोजी त्यात एकूण 500 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ दिसली. 15 ते 16 मे दरम्यान सोने 1100 रुपयांनी वधारले. 17 मे रोजी त्यात 270 रुपयांची घसरण झाली. तर 18 मे रोजी 870 रुपयांची मुसंडी मारली. या आठवड्यात सोने जवळपास दोन हजारांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची तुफान बॅटिंग
एक किलो चांदीचा भाव 5 मार्च रोजी 72,265 रुपये इतका होता. तर एक किलो चांदीचा भाव 5 एप्रिल रोजी 79,096 रुपयांवर आला. आता एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 93,000 रुपये मोजावे लागणार आहे. या आठवड्यात चांदी 13 मे रोजी चांदी 500 रुपयांनी उतरली तर 14 ते 16 मे या तीन दिवसांत चांदी 2600 रुपयांनी महागली. शुक्रवारी किंमती जैसे थे होत्या. शनिवारी चांदीने 3900 रुपयांची हनुमान उडी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 73,383 रुपये, 23 कॅरेट 73,089 रुपये, 22 कॅरेट सोने 67,219 रुपये झाले. 18 कॅरेट 55,037 रुपये, 14 कॅरेट सोने 42,929 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 86,373 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.