चांदीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. चांदीने या दहा दिवसांत गरुड झेप घेतली होती. सोन्याने घौडदौड करत 75 हजारांचा टप्पा ओलांडला. ग्राहक या घौडदौडीने भांबावून गेले. पण या चार दिवसांत मौल्यवान धातूत मोठी पडझड झाली. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. चार दिवसांत सोने 2700 रुपयांनी स्वस्त झाले. तर चांदी दणकावून आपटली. चांदी 6 हजारांनी खाली आली. सराफा बाजारात आठवड्याच्या अखेरीस अशा आहेत मौल्यवान धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 25 May 2024 )
सोन्यात मोठी पडझड
या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने नवीन विक्रम केला. सोन्याचा भाव 75 हजारांच्या घरात पोहचला. 20 मे रोजी सोने 500 रुपयांनी वधारले. दुसऱ्या दिवशी सोने 650 रुपयांनी स्वस्त झाले. 22 मे रोजी भाव स्थिर होता. गुरुवारी 1100 रुपयांनी भाव उतरला. 24 मे रोजी भाव 980 रुपयांनी खाली आला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी आपटली
या दोन आठवड्यात चांदीने 12,000 हून अधिकची मुसंडी मारली होती. पण या आठवड्यात चांदी तोंडावर आपटली. 20 मे रोजी चांदी 3500 रुपयांनी वधारली. 21 मे रोजी 1900 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 22 मे रोजी 1200 रुपयांनी चांदी वधारली. 23 मे रोजी किलोमागे चांदीचा भाव 3300 रुपयांनी आपटला. 24 मे रोजी 500 रुपयांनी चांदी स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 72,028 रुपये, 23 कॅरेट 71,740 रुपये, 22 कॅरेट सोने 65,978 रुपये झाले. 18 कॅरेट 54,021 रुपये, 14 कॅरेट सोने 42,136 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 89,762 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
गेल्या पाच वर्षांत असा दिला रिटर्न
गेल्या पाच वर्षांत सोन्याने ग्राहकांना, गुंतवणूकदारांना 18% वार्षिक परतावा दिला आहे. तर याच दरम्यान निफ्टीने वार्षिक जवळपास 15 टक्क्यांची झेप घेतली आहे. अर्थात 1, 3, 10 आणि 15 वर्षांच्या आकडेवारी नजर टाकली तर निफ्टीने सोन्याला पिछाडीवर टाकल्याचे दिसून येते. गेल्या सात वर्षांत दोघांचा रिटर्न सारखाच होता. या दरम्यान निफ्टीने 15% सीएजीआर रिटर्न तर सोन्याने 14 टक्के वाढ नोंदवली.