Gold Silver Rate Today : बाप्पा पावला! सोने-चांदीच्या दरवाढीचे विसर्जन
Gold Silver Rate Today : डॉलरच्या मजबूतीने सोने-चांदीचे पानिपत केले आहे. तरीही जागतिक बाजारात सोन्याने बरीच आघाडी घेतली आहे. तरीही मौल्यवान धातू सध्या दबावाखाली आहे. गेल्या दोन दिवसांत किंमतीत मोठी घसरण झाली. ग्राहकांना बाप्पा पावला. सोने-चांदीच्या वाढलेल्या दराचे पण विसर्जन झाले.
नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : सोने-चांदी डॉलरपुढे पुन्हा नतमस्तक झाले. या वर्षात जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात सोने-चांदीने रेकॉर्ड नावावर केले होते. त्यामुळे यावर्षात सोने 75 हजारांचा तर चांदी 90,000 रुपयांचा टप्पा गाठेल, असे भाकित करण्यात येत होते. आता वर्ष संपायला तीन महिन्यांचा कालावधी आहे. सोन्याला गेल्या सहा महिन्यात ना नवीन रेकॉर्ड करता आला ना मोठी उसळी घेता आली. एका ठराविक किंमतीत सोने-चांदी खेळत आहे. त्यात चढउतार होत आहे. शेअर बाजाराप्रमाणेच या दोन्ही धातूची खरेदी-विक्री केली असती तरी गुंतवणूकदारांना दर महिन्याला चांगला नफा खिशात घालता आला असता. आता सोने-चांदी इतके स्वस्त (Gold Silver Price Today 28 September 2023) झाले आहेत.
अशी आली स्वस्ताई
गुडरिटर्न्सनुसार, या महिन्यात सोन्याला मोठी मजल मारता आलेली नाही. सुरुवातीलाच सोने-चांदीत मोठी घसरण झाली. या घसरणीला महिन्याच्या मध्यात ब्रेक लागला. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी प्रत्येकी 200 रुपयांनी किंमती वधारल्या. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी चढले. 19 सप्टेंबर रोजी सोन्यात 150 रुपयांची उसळी घेतली. 21 सप्टेंबर रोजी 150 रुपयांची स्वस्ताई आली. 22 सप्टेंबर रोजी किंचित घसरण आली. 23 सप्टेंबर रोजी 100 रुपयांची वाढ झाली. 24, 25 सप्टेंबर रोजी दर जैसे थे होते. 26 सप्टेंबर रोजी 200 रुपयांनी किंमती घसरल्या. 27 सप्टेंबर रोजी 250 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 22 कॅरेट सोने 546500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.
चांदीत मोठी घसरण
ऑगस्ट प्रमाणेच चांदीला सप्टेंबर महिन्यात मोहिम फत्ते करता आली नाही. अगदी सुरुवातीलाच 5000 रुपयांची पडझड झाली. त्यानंतर या 22 तारखेला एक हजारांनी किंमती वधारल्या. 23 सप्टेंबर रोजी 300 रुपयांची उसळी आली. आता 26 सप्टेंबर रोजी 1000 रुपयांनी भाव घसरला. तर 27 सप्टेंबर रोजी 600 रुपयांची स्वस्ताई आली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,200 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट असा आहे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 58,454 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,220 रुपये, 22 कॅरेट सोने 53,544 रुपये, 18 कॅरेट 43,841 रुपये, 14 कॅरेट सोने 34,196 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,930 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.