Gold Silver Rate Today : खरेदीची करा लगबग, सोने-चांदीत मोठी पडझड!
Gold Silver Rate Today : सोने दिवाळीपर्यंत 2500 रुपयांनी तर चांदी त्यापेक्षा पण स्वस्त होईल, असा अंदाज बाजारात व्यक्त केल्या जात आहे. जागतिक घडामोडींवर हा अंदाज आहे. पण कच्चे तेल गणित बिघडवू शकते. सध्या सोने-चांदीतील घसरण ग्राहकांच्या पथ्यावर आहे. पितृपक्ष असल्याने खरेदीवर परिणाम दिसू शकतो.
नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : जागतिक घडामोडींमुळे सोने-चांदीच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दोन्ही धातू जमिनीवर आले आहेत. डॉलर (Dollar Index) ऐतिहासिक दिशेने आगेकूच करत आहे. अमेरिकन केंद्रीय बँकेने यावेळी व्याजदर जैसे थे ठेवले असले तरी पुढील सत्रात मात्र फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी त्यांचा मोर्चा सोने-चांदीऐवजी डॉलर आणि इतर वस्तूंमध्ये गुंतवायला सुरुवात केली आहे. भारतात आता पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस बरेच लोक नवीन वस्तू खरेदी करणे टाळतात. त्यामुळे ते सराफा बाजारातही फिरकणार नाहीत. मागणी कमी होण्याच्या शक्यतेचा परिणाम पण या दोन्ही धातूंच्या किंमतींवर दिसून येत आहे. सोने-चांदी (Gold Silver Price Today 29 September 2023) सध्या इतके स्वस्त झाले आहे.
सोन्याचा आपटी बार
गुडरिटर्न्सनुसार, एकूण सप्टेंबर महिनाच ग्राहकांना पावला. सोन्याला मोजून दहा दिवस पण उसळी घेता आली नाही. सोने गेल्या सहा महिन्यांपासून एका निश्चित किंमतीत खेळत आहे. तितकाच चढउतार त्यामध्ये दिसून येत आहे. 15 ते 19 सप्टेंबर या काळातच सलग तेजी दिसून आली. सोने 700 रुपयांनी वधारले. 24, 25 सप्टेंबर रोजी दर जैसे थे होते. 26 सप्टेंबर रोजी 200 रुपयांनी किंमती घसरल्या. 27 सप्टेंबर रोजी 250 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 28 सप्टेंबर रोजी सोन्याने 650 रुपयांची आपटी खाल्ली. 22 कॅरेट सोने 54,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,950 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.
2 हजारांनी चांदी स्वस्त
चांदीला या महिन्यात चमक दाखवता आली नाही. या महिन्याच्या सुरुवातीलाच चांदी 5000 रुपयांनी स्वस्त झाली होती. या 22 तारखेला 1 हजारांनी किंमती वधारल्या. 23 सप्टेंबर रोजी 300 रुपयांची उसळी आली. 26 सप्टेंबर रोजी 1000 रुपयांनी भाव घसरला. 27 सप्टेंबर रोजी 600 तर 28 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी चांदी घसरली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 73,700 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट असा आहे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 57,998 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 57,766 रुपये, 22 कॅरेट सोने 53,126 रुपये, 18 कॅरेट 43,499 रुपये, 14 कॅरेट सोने 33,929 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,432 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.