नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : जागतिक बाजारात सोने-चांदीने किंचित उसळी घेतली. भारतीय सराफा बाजारात सोन्याला लांब पल्ला गाठता आला नाही. चांदीने मात्र षटकार लगावला. महागाई आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकने प्रयत्न सुरु केले आहेत. व्याजदर जैसे थे ठेवले असले तरी भविष्यात व्याजदरात 0.25 बेसिस पॉईंट वाढीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोने-चांदीकडे मोर्चा वळवला आहे. अर्थात जागतिक बाजारात अजूनही मोठी गुंतवणूक झालेली नाही. चीनने बाजारात हात आखडता घेतल्याने मोठा उलटफेर होत आहे. दोन्ही मौल्यवान धातूंना मोठी झेप घेण्यासाठी बळ मिळताना दिसत नाही. सराफा बाजारात सोने-चांदीने (Gold Silver Price Today 23 September 2023) घसरणीच्या सत्राला ब्रेक लावला. दोन्ही धातूंमध्ये इतकी वाढ झाली आहे.
सोने-चांदी चमक दाखवणार का?
सोने-चांदीत सलग पाच दिवस तेजी दिसून आली. पाच दिवसांत सोने 700 रुपयांनी तर चांदी 1000 रुपयांनी वधारले होते. पण त्यानंतर बुधवारपासून त्याला ब्रेक लागला. आता दोन्ही धातूंनी किंचीत उसळी घेतली आहे. पुढील आठवड्यात सोने-चांदीला उसळी घेता येईल का? याविषयी गुंतवणूकदारांच्या मनात किंतु परंतु आहे. डॉलर वधारला तर सोने-चांदीसाठी परिस्थिती अवघड होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सोन्यात चढउतार
गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्यात सोन्याला मोठा पल्ला गाठता आलेला नाही. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी सोन्यात प्रत्येकी 200 रुपयांची वाढ झाली. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी वधारले. 19 सप्टेंबर रोजी 150 रुपयांनी दर वधारले. सोन्याने पाच दिवसांत चांगली उसळी घेतली. 20 सप्टेंबर रोजी मोठा बदल झाला नाही. 21 सप्टेंबर रोजी किंमती 150 रुपयांनी स्वस्त झाल्या. 22 सप्टेंबर रोजी किंचित घसरण आली. 22 कॅरेट सोने 54990 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,930 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.
चांदीत एक हजारांनी वाढ
22 सप्टेंबर रोजी मरगळ झटकत चांदीने एक हजारांची आघाडी घेतली. या महिन्याच्या सुरुवातीलाच चांदीत 5000 रुपयांची घसरण झाली. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी चांदी 1200 रुपयांनी वधारली. तर 18 सप्टेंबर रोजी चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 19 सप्टेंबर रोजी चांदी 300 रुपयांनी महागली. 20 सप्टेंबर रोजी 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 59,134 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,897 रुपये, 22 कॅरेट सोने 54167 रुपये, 18 कॅरेट 44,351रुपये, 14 कॅरेट सोने 34,593 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,175 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.