Gold Silver Rate Today : सोने चकाकले, चांदीची सलामी, किंमतीत इतकी उसळी
Gold Silver Rate Today : सोने-चांदीने आज सकाळीच बदलाची नांदी दिली. आज, 6 जुलै रोजी दोन्ही धातूंनी दरवाढीची सलामी ठोकली. गेल्या अनेक दिवसांपासून सकाळच्या भावात मोठी तफावत दिसत नव्हती. आज या मौल्यवान धातूंच्या किंमती इतक्या वधारल्या.
नवी दिल्ली : सोने-चांदीने आज दरवाढीची सलामी दिली. अनेक दिवसांनी किंमतींनी उचल खाल्ली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मे आणि जून महिन्यापासून सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) मोठी तफावत दिसून आली नाही. जानेवारी ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान सोने आणि चांदीने अनेक उच्चांक गाठले. दिवाळीनंतर सोन्याच्या भावात 10-11 हजारांची उसळी आली. तर चांदीने पण तोरा मिरवला. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मे आणि जून महिन्यात किंमतीत मोठी घसरण झाली. 24 कॅरेट सोने 58,000 रुपयांच्या जवळपास येऊन ठेपले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला भावात बदल दिसत आहे. सोने या महिन्याच्या सुरुवातीलाच 450 रुपयांच्या जवळपास वधारले आहे. तर चांदीत ही दरवाढ झाली आहे. जुलै महिन्यात सोने-चांदी रेकॉर्ड करणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महिन्याच्या सुरुवातीला दरवाढ जुलै महिना सोने-चांदीसाठी पावला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 1 जून रोजी सोन्याने 220 रुपयांची उसळी घेतली. 4 जुलै रोजी भाव 100 रुपयांनी वधारले. तर 3 जून रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली. तर 6 जुलै सोन्यात पुन्हा 100 रुपयांची उसळी आली. या महिन्याच्या सुरुवातीलाच 420 रुपयांची दरवाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,400 रुपये तर 24 कॅरेट सोने 59,320 रुपयांवर पोहचले. जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी 30 जून रोजी किंमती वधारल्या होत्या. 29 जून रोजी घसरण झाली. भाव 58,900 रुपयांवर आले. तर 30 जून रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 59,000 रुपयांवर पोहचले होते. गुडरिटर्न्सनुसार या किंमती आहेत.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव 5 जुलै रोजी सोन्यात तेजी दिसून आली. 24 कॅरेट सोने 58,631 रुपये, 23 कॅरेट 58,396 रुपये, 22 कॅरेट सोने 53,706 रुपये, 18 कॅरेट 43973 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34299 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.
चांदी खुलली या महिन्यात चांदीच्या भावाने चांगलीच हजेरी लावली. 1 जुलै रोजी चांदीच्या किंमतीत प्रति किलो 500 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 5 जुलै रोजी चांदीत 500 रुपयांची वाढ झाली. तर आज 6 जुलै रोजी किलोमागे चांदीचा भाव 800 रुपयांनी वाढले. आज सकाळच्या सत्रात गुडरिटर्न्सनुसार एक किलो चांदीचा भाव 73,000 रुपयांवर पोहचला.
गेल्या 6 वर्षांत इतकी घसरण सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे गेल्या 6 वर्षांत सोन्याला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अहवालानुसार, एक वर्षांत सोन्याच्या मागणीत 17 टक्के घट झाली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 135 टन सोने आयात झाले. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत ही मागणी घसरुन 112 टनवर आली. मूल्यआधारीत विचार करता, 9 टक्के घट झाली. मार्च तिमाहीत हा आकडा 56,220 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षांतील याच तिमाहीत हा आकडा 61,540 कोटी रुपये होता.
मे-जूनमध्ये घसरण सध्या सोने 60,000 रुपयांच्या आतबाहेर खेळत आहे. चांदीत पण मोठी उसळी दिसलेली नाही. सोन्याचे भाव 1100 रुपयांच्या आसपास घसरले आहेत. मेनंतर जून महिन्यात पण सोने-चांदीने हेच नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने दरवाढीचे नवीन रेकॉर्ड तयार केले होते.