Gold VS Sensex : सोन्याने उघडले नशीब की शेअर बाजाराने लावली लॉटरी, 5 वर्षांत कोणी केले मालामाल
Gold VS Sensex : भारतीय सोन्यावर फिदा आहेत. चीन खालोखाल भारत मोठा सोन्याचा आयात करणारा देश आहे. शेअर बाजारातही तेजीचे नवनवीन विक्रम होत आहे. कोणी केले गुंतवणूकदारांना मालामाल..
नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : भारतीयांना सोन्याचे वेड आहे. प्रत्येक सण-उत्सव, समारंभ, लग्न, कार्यात सोन्याचे दागिने भारतीय स्त्रीयांचे सौंदर्य खुलवतात. भारतात सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) सर्वात सुरक्षित मानण्यात येते. गेल्या दहा वर्षात सोन्याने दुप्पट दर गाठला आहे. सोने चमकले आहे. गेल्यावर्षी दिवाळीनंतर सोने सूसाट सुटले. सोन्याने नवनवीन रेकॉर्ड केले. मे आणि जून महिना वगळता जुलै महिन्यात सोने पुन्हा 60,000 प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चीन खालोखाल भारत मोठा सोन्याचा आयात करणारा देश आहे. शेअर बाजारातही (Share Market) तेजीचे नवनवीन विक्रम होत आहे. कोणी केले गुंतवणूकदारांना गेल्या 5 वर्षांत मालामाल..
दोन्हीकडे तेजोमय वातावरण
देशात गेल्या 5 वर्षांत अनेक चढ-उतार बघायला मिळाले. भारतीय अर्थव्यवस्था गतीमान झाली. कोरोनात भारतीय मजूर, कामगार, कर्मचाऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागले. रशिया-युक्रेन युद्धाने देशात महागाईचा आगडोंब उसळला. अनेक आघाड्यांवर केंद्र सरकारला तोंड देताना नाकी नऊ आले. या पाच वर्षांच्या कालावधीत सोन्याने मोठी झेप घेतली आणि शेअर बाजाराने नवनवीन उच्चांक गाठला.
सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित
भारतीयांची सोन्यावर श्रद्धा आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. सोने 70,000 मनसबदार होईल, असे अंदाज बांधल्या जात आहे. तर चांदी 90,000 घरात पोहचेल असे भाकित आहे.
शेअर बाजाराची मुसंडी
भारतीय शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. कित्येक वर्षांपासून 15,000 अंकांच्या टप्प्यात असलेला निफ्टी बाजार 20,000 अंकांच्या घरात पोहचला. तर 60,000 अंकावरुन बीएसई सेन्सेक्सने 66,000 अंकांचा वेध घेतला.
परताव्यात सोने आघाडीवर
आकड्यानुसार, 2018 नंतर आतापर्यंत म्हणजे गेल्या 5 वर्षांत सोन्याच्या भावात जवळपास 99 टक्क्यांची वाढ झाली. तर दुसरीकडे बीएसई सेन्सेक्सने (BSE Sensex) 77 टक्क्यांची चढाई केली. म्हणजे परताव्यात सोन्याने शेअर बाजारापेक्षा आघाडी घेतली.
सोन्याचा परतावा
सोन्याने सोन्यावाणीच परतावा दिला. जुलै 2018 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 30,800 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास होता. या महिन्यात, जुलै 2023 मध्ये सोन्याची किंमत वाढून ती 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचली. सोन्याने गेल्या पाच वर्षांत 99 टक्क्यांचा परतावा दिला.
सेन्सेक्सने काय केली कमाल
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांक जुलै 2018 मध्ये 37,550 अंकाच्या स्तरावर होता. यावर्षी जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात तो 61,000 ते 62,000 अंकावर पोहचला. यामध्ये तेजीचे सत्र आहे. सध्या निर्देशांक 66,000 अंकावर पोहचला आहे. त्याने 77 टक्क्यांची चढाई केली आहे.
रुपयाचं अवमूल्यन पथ्यावर
भारतीय रुपयात मोठी घसरण दिसली. रुपया कमकूवत झाल्याने जागतिक बाजारात सोन्याने चार चांद लावले. सोन्याच्या किंमती वधारल्या. 2017 मध्ये रुपया 63 प्रति डॉलरवर होता. तो आज जवळपास 82 प्रति डॉलरवर पोहचला. रुपयामध्ये 30 टक्क्यांची घसरण आली.