देशात इलेक्ट्रीक वाहनांची नांदी आली आहे. अनेक शहरात इलेक्ट्रीक वाहने (Electric Vehicle) दिसून येत आहे. चारचाकी आणि दुचाकीचा वापरही वाढला आहे. परंतू वाढत्या किंमतींमुळे अजूनही या गाड्या सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या एका घोषणेमुळे चारचाकी इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्याची तयारी करणा-या ग्राहकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. लवकरच पेट्रोल चारचाकी वाहनांच्या (Petrol Vehicle) किंमतीतच इलेक्ट्रीक चारचाकी वाहन ही उपलब्ध होईल अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. टीव्ही9 भारतवर्षने आयोजीत केलेल्या ग्लोबल समिटमध्ये (Global Summit) भारत आज क्या सोचता है या विषयावर बोलताना त्यांनी याविषयीचे महत्वपूर्ण वक्तव्य केले. देशात एका वर्षाच्या आत इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती पेट्रोल वाहनांच्या किंमतींच्या बरोबरीने आणण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे जीवाश्म इंधनावर अर्थात पेट्रोलवरचा सरकारच्या खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करता येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विचार मांडताना, गडकरी यांनी इलेक्ट्रीक वाहन महाग कशामुळे आहे, याकडे लक्ष वेधले. या वाहनातील बॅटरीसाठी जास्त खर्च येतो. त्याचा परिणाम इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमतींवर होतो. एकूण या वाहनांच्या किंमतीचा विचार करता एकट्या बॅटरीचाच वाटा 35 ते 40 टक्के असल्याचा दावा गडकरी यांनी केला. हा खर्च कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. येत्या वर्षभरात या प्रयत्नांना यश येईल आणि वाहनधारकांना स्वस्तात इलेक्ट्रीक चारचाकी वाहन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकार केवळ भूपृष्ठ मार्गावरच काम आहे असे नाही. भारतात रस्त्यांचा मोठ्या गतीने विकास झाला असून समृद्धी मार्गाने तर अनेक प्रांताना आणि राज्यांना अगदी हाकेच्या अंतरावर आणून सोडले आहे. असे असले तरी सरकार केवळ याच मार्गांना प्राधान्य देत आहे असे नाही. रस्ते वाहतुकीपेक्षा जलवाहतूक स्वस्त, किफायतशीर आणि पर्यावरणाचा -हास वाचवणारी ठरणार असल्याने सरकार यावरही मोठ्या वेगाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय इलेक्ट्रिक वाहन उद्योगात कोरियन कंपनी हुंदाई लवकरच प्रवेश करणार आहे. कंपनी त्यांची नवीन
इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करणार आहे. येत्या काही महिन्यात ही कार भारतात दाखल होऊ शकते. आईओनिक 5 इलेक्ट्रिक व्हेकल भारतात दाखल करणार आहे. ही कार सर्वसामान्यांच्या आवाक्यात असून गाडीवाडी या संकेतस्थळाच्या दाव्यानुसार कंपनी त्यांच्या काही इलेक्ट्रीक कार भारतात घेऊन येत आहे. त्यात स्मॉल इलेक्ट्रीक व्हेकलचा ही सुखद धक्का असणार आहे.