नवी दिल्ली : रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर अनेक बॅंका होम आणि कार लोन सह सर्व प्रकारच्या लोनमध्ये वाढ करीत आहेत. मात्र सरकारी क्षेत्रातील मोठी बॅंक असलेल्या बॅंक ऑफ बडोदा हिने आपल्या लाखो ग्राहकांसाठी गुड न्यूज आणली आहे. बॅंक ऑफ बडोदाने होळीच्या मुहूर्तावर आपल्या होम लोनच्या व्याजावर मोठी कपात केली आहे. बॅंक ऑफ बडोदाने आपल्या होम लोनच्या व्याज दरात 0.40 टक्के कपात करीत ते 8.5 टक्के केले आहे. या निर्णयामुळे अनेकांचा ईएमआयचा भार कमी होणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बॅंक पैकी एक असलेल्या बॅंक ऑफ बडोदाने आपल्या होम लोनच्या व्याजदरात कपात केली आहे. याच सह या बॅंकेने आपल्या होम लोनसाठीच्या प्रोसेसिंग फीलाही पूर्णपणे समाप्त केले आहे. बॅंक ऑफ बडोदाने दिलेल्या माहितीनूसार व्याजदरात केलेला हा बदल पाच मार्च 2023 ते 31 मार्च2023 पर्यंतच राहणार आहे.
व्यापारासाठी मिळणार स्वस्तात लोन
बॅंक ऑफ बडोदाने व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा दिला आहे. बिझनेससाठी देण्यात येणाऱ्या एमएसएमई लोनवरील व्याज दरातही बॅंक ऑफ बडोदाने कपात केली आहे. एमएसएमई लोनवरील व्याज दर 8.4 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंक ऑफ बडोदाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की व्याजदराबाबत घेतलेले हे दोन्ही निर्णय पाच मार्च 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत लागू राहणार आहेत. बॅंकेने म्हटले आहे की उद्योगधंद्यातील हे सर्वात कमी आणि व्यवसायाला उत्तेजन देणारे हे व्याजदर आहेत. तसेच बॅंकेने होम लोनसाठीच्या प्रक्रीया शुल्क पूर्ण पणे माफ केली आहे. तर एमएसएमई कर्जावरील प्रक्रीया शुल्कात पन्नास टक्के कपात केली आहे.
रेपोरेट वाढल्याने होम लोन महाग झाले
रिझर्व्ह बॅंकेने मे 2022 नंतर रेपोरेटमध्ये 2.50 टक्के वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये सुद्धा रेपोरेट दर 0.25 टक्के वाढून 6.50 टक्के झाले होते. यामुळे देशातील अनेक बॅंकांनी होम लोनच्या व्याज दरात अनेक वेळा वाढ केली आहे. कोरोना नंतर अनेकांचे उत्पन्न घटले आहे. तर महागाईत वाढ झाली आहे. होम लोन, कार लोनसह अनेक कर्जाचे हप्ते ईएमआय वाढले आहेत. बॅंक ऑफ बडोदाच्या या निर्णयाने होम लोन घेणाऱ्यांचा फायदा होणार आहे.